‘भरपूर मुलं जन्माला घाला, घर मोदी देतील’, दोन पत्नी, आठ मुले असलेल्या मंत्र्याचं विधान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 02:49 PM2024-01-10T14:49:42+5:302024-01-10T14:50:20+5:30
Rajasthan News: राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. मात्र सरकारची स्थापना होऊन महिनाही उलटत नाही तोच येथील आमदार आणि मंत्र्यांनी वादग्रस्त विधानं करून नवनव्या वादांना तोंड फोडण्यास सुरुवात केली आहे.
राजस्थानमध्येभाजपाची सत्ता आल्यानंतर भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. मात्र सरकारची स्थापना होऊन महिनाही उलटत नाही तोच येथील आमदार आणि मंत्र्यांनी वादग्रस्त विधानं करून नवनव्या वादांना तोंड फोडण्यास सुरुवात केली आहे. आचार्य बालमुकुंद यांच्या विधानानंतर आता मंत्री बाबूलाल खराडी यांचं एक विधान चर्चेत आहेत. खराडी यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये बोलताना लोकांना अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी हे विधान गमतीचा भाग म्हणून केलं होतं. हेच विधान आता चर्चेत आहे.
आदिवासी विकास मंत्री खराडी यांनी जिल्ह्यातील नाई गावामध्ये विकसित भारत संपर्क यात्रेंतर्गत आयोजित एका कार्यक्रमामध्ये हे विधान केलं. ते म्हणाले की, तुम्ही भरपूर मुलांना जन्माला घाला. अडचण कुठली आहे? कुणी उपाशी आणि बेघर राहणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे स्वत: खराडी यांच्या दोन पत्नी आणि आठ मुले आहेत. त्यात चार मुलगे आणि चार मुलींचा समावेश आहे. या भागात बहुविवाह प्रथा अजूनही सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला घर बांधून देतील, असं विधान त्यांनी करताच उपस्थितांनी खो खो हसायला सुरुवात केली. खराडी यांनी हे विधान केलं तेव्हा मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हेही मंचावर उपस्थित होते. झाडोल विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार झालेले आणि पहिल्यांदाच मंत्री बनलेल्या बाबूलाल खराडी यांच्या विधानाची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.