गोष्ट एका राजाची! त्रिपुरामध्ये पहिल्याच प्रयत्नात आणला भाजपाच्या नाकी दम, कोण आहेत ते? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 04:01 PM2023-03-03T16:01:26+5:302023-03-03T16:04:33+5:30
Tripura Assembly Election Result: त्रिपुरा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचं टेन्शन काँग्रेस आणि डाव्यांच्या आघाडीने नाही तर दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टिपरा मोथा पक्षाने वाढवलं होतं.
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने बहुमतासह विजय मिळवला आहे. मात्र सत्ता मिळवताना भाजपाची दमछाक झाल्याचे दिसून आले. मात्र भाजपाचं टेन्शन काँग्रेस आणि डाव्यांच्या आघाडीने नाही तर दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टिपरा मोथा पक्षाने वाढवलं होतं. त्यामुळेच या निकालांनंतर भाजपाच्या विजयापेक्षा टीपरा मोथा पक्षाचे प्रमुख प्रद्योत किशोर माणिक्य देववर्मा यांची आणि त्यांच्या पक्षाने केलेल्या कामगिरीची चर्चा होत आहे.
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीतील निकालांनी उत्साहित झालेल्या प्रद्योत देववर्मा यांनी सांगितले की, एक दोन वर्षे जुना पक्ष आज त्रिपुरामध्ये युवा आणि दुसरा सर्वात मोठा पक्ष बनला आहे. हा जनतेचा आशीर्वाद आहे. आम्ही थोडे उशिराने आलो आहोत. मात्र दोन वर्षांमध्ये शुन्यावरून १३ जागांपर्यंत मजल मारणं हे मोठं यश आहे. सीपीएम आज ११ आणि काँग्रेस ३ जागांवर आहे. ही आमच्यासाठी खूप मोठी बाब आहे.
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीमध्ये टिपरा मोथा पक्षाने सुरेख कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. राजघराण्यात जन्मलेल्या प्रद्योत यांच्यासाठी राजकारणाचा हा मार्ग तितकासा सोपा नव्हता. मात्र त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्रिपुराच्या राजकारणात एका नव्या पर्यायाचा उदय झाला आहे. प्रद्योत देबबर्मा हे त्रिपुराचे १८५ वे महाराजा कीर्ती बिक्रम किशोर देबबर्मा यांचे एकुलते एक पुत्र आहेत. त्यांचा जन्म ४ जुलै १९७८ रोजी दिल्लीत झाला होता. राजेशाही संपुष्टात आल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये होते. दरम्यान २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांनी टिपरा मोथा पक्षाची स्थापना केली.
काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात आलेल्या प्रद्योत यांनी राजकारणात येताच आदिवासी समुदायामध्ये सक्रियपणे काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी काँग्रेस सोडल्यानंतर ग्रेटर टिपरालँडची मागणी केली. तसेच ग्रेटर टिपरालँड हे त्रिपुरापासून वेगळं राज्य असेल, असं ते सातत्याने सांगत असतात.