ओल्या बाळंतीणीने 250 किमी दूर जात दिली परीक्षा; बनली न्यायाधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 08:08 AM2024-02-17T08:08:00+5:302024-02-17T08:14:46+5:30
बनली पहिली आदिवासी दिवाणी न्यायाधीश
चेन्नई : तामिळनाडूच्या आदिवासी समुदायातील महिला व्ही. श्रीपथी या महिलेची दिवाणी न्यायाधीशपदासाठी निवड झाली आहे. ती राज्यातील पहिली महिला आदिवासी आहे, जिची दिवाणी न्यायाधीशपदी निवड झाली. तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील जवाधू डोंगराजवळील पुलियूर गावातील रहिवासी असलेल्या श्रीपथीने नोव्हेंबर २०२३ मध्ये परीक्षेला बसण्यासाठी २५० किमीचा प्रवास करून चेन्नई गाठली होती. यामुळे तिची ही कहानी अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. श्रीपथीच्या परीक्षेच्या दिवशीच तिची प्रसूतीची तारीखही होती. मात्र, परीक्षेच्या दोन दिवस आधी तिने मुलाला जन्म दिला.
nतिने प्रसूतीनंतर आपला जीव धोक्यात घालून परीक्षेला बसण्यासाठी चेन्नईला जाण्याचा निर्णय घेतला. ती परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाली आणि तिच्या समाजातील पहिली आदिवासी महिला दिवाणी न्यायाधीश बनली.
nतिच्या या यशाबद्दल तिच्या गावानेही स्वागत समारंभ आयोजित केला होता. या यशानंतर श्रीपथी यांचे त्यांच्या गावात ढोल-ताशे, हार आणि भव्य मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले. तिच्या या कामगिरीचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्यासह अनेकांनी कौतुक केले आहे.
गावकऱ्यांनी केले जंगी स्वागत
nव्ही. श्रीपथी कलिअप्पन आणि मल्लिगा यांची मोठी मुलगी आहे. बी.ए. आणि कायद्याची पदवी घेण्यापूर्वी श्रीपथीने येलागिरी हिल्समध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर तिचे लहान वयातच लग्न झाले. तिने पती आणि आईच्या पाठिंब्याने एलएल.बी. पूर्ण केले आणि तामिळनाडू लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्ज केला.
मुख्यमंत्री म्हणतात...
तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील जवाधू डोंगराच्या शेजारी असलेल्या पुलियूर गावातील श्रीपथीने वयाच्या २३ व्या वर्षी दिवाणी न्यायाधीश परीक्षा उत्तीर्ण केली आहे. एका वंचित डोंगरी आदिवासी मुलीने इतक्या कमी वयात हे यश मिळविले, हे पाहून मला आनंद झाला.
एम.के. स्टॅलिन, मुख्यमंत्री, तामिळनाडू