‘जिसके सिक्के में आवाज, उसी का चलेगा’; कुठे मतदारांचे मौन तर कुठे ‘लस्सी पे चर्चा’, 'हा' मुद्दा ठरतोय महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 07:48 AM2022-02-13T07:48:32+5:302022-02-13T07:49:29+5:30

नोयडा आणि गाझियाबाद जिल्ह्यांतील मतदारांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर सत्येंद्र सिंग म्हणाले, ‘बाबूजी यू पी मे का बा सुने हो, नही तो सुन लो. सब समज आ जायेगा.’ नोयडा, गाझियाबादला दोन ते तीन तास घालवले.

The subject of law and order is becoming important in the Uttar Pradesh Assembly Election election | ‘जिसके सिक्के में आवाज, उसी का चलेगा’; कुठे मतदारांचे मौन तर कुठे ‘लस्सी पे चर्चा’, 'हा' मुद्दा ठरतोय महत्त्वाचा

‘जिसके सिक्के में आवाज, उसी का चलेगा’; कुठे मतदारांचे मौन तर कुठे ‘लस्सी पे चर्चा’, 'हा' मुद्दा ठरतोय महत्त्वाचा

Next

गजानन चोपडे -

लखनौ
: पंधरा दिवसांपूर्वी पश्चिम उत्तर प्रदेशात पाच ते सहा अंश सेल्सिअस तापमानातही प्रचंड गर्मी जाणवली. जिकडे-तिकडे गर्मी अन् चरबीचीच चर्चा. अशात लोकगायिका नेहा सिंग राठोड यांच्या ‘यू पी में का बा’ या गाण्याने चांगलीच उचल खाल्ली. परंतु, गायिकेने नेमके कुणाला टार्गेट केले आहे, सुरुवातीला हेच कळत नसल्याने राजकीय पक्षांनी त्याचे पाॅलिटिकल मायलेज घेण्याची हिंमत केली नाही. प्रत्येकजण हेच विचारतो, यू पी मे का बा.…

नोयडा आणि गाझियाबाद जिल्ह्यांतील मतदारांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर सत्येंद्र सिंग म्हणाले, ‘बाबूजी यू पी मे का बा सुने हो, नही तो सुन लो. सब समज आ जायेगा.’ नोयडा, गाझियाबादला दोन ते तीन तास घालवले. कुठेही बॅनर नाही की पोस्टर नाही. कुणी काही बाेलायलाही तयार नाही. येथे मतदारांचे मौन मात्र बरंच काही सांगून गेलं. मेरठ जिल्ह्यात प्रवेश करताच निवडणुकीची धामधूम जाणवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भाजपचे हेच दोन चेहरे नुसते बॅनरवरच नव्हते तर लोकांच्या बोलण्यातूनही जाणवले. तिकडे अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांचाही प्रचार जोरात होता. 

पश्चिम उत्तर प्रदेशातील भाजपचे मीडिया प्रभारी गजेंद्र सिंग यांच्याशी चर्चा झाली. गेल्या निवडणुकीत मेरठ जिल्ह्यातील सातपैकी सहा जागा भाजपने राखल्याचे ते सांगत होते. यंदाही राखू पण मेहनत जास्त करावी लागत असल्याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली. बरनावा गावात चहाची टपरी चालविणारा सोनू म्हणतो, इस बारी आसान नही है साहाब. मोरे पास तो तरह-तरह के लोग आते है. सपाने हिंदू प्रत्याशी उतारा है तो फरक पड सकता है. राधारानीचे गाव बरसाना. देशभरातून भाविक येथील मंदिराला भेट देतात. मंदिराच्या पायथ्याशी महाराजांचे लस्सी सेंटर आहे. तिथे चिक्कार गर्दीतही चर्चा होती ती उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचीच. ग्राहकांना लस्सी देताना महाराजांनीही चर्चेत उडी घेतली.

मोदी नही भय्या ‘ओन्ली’ योगी -
-    ई-रिक्षातून प्रवास करताना त्याचा चालक दीपक विश्वकर्मा म्हणाला, सपाने ऑफर दी थी, प्रचार मे गाडी लगाओ. इक हजार रुपये रोज देंगे. हमने कहा, ‘दफा कर सायकल को.
-    कमल की बात कर. हम कहते है मोदी नही ओन्ली योगी.’ कायदा, सुव्यवस्थेचा मुद्दा या निवडणुकीत मुख्य मुद्दा आहे. 
-    गुंड आणि दहशत माजविणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्यामुळे भाजपने हाच धागा पकडून प्रचारावर भर दिला. मुजफ्फरनगर, बुलंद शहर, हापूड या जिल्ह्यांमध्ये भाजप आणि सपा-रालोदमध्ये काट्याची टक्कर दिसली. 
-    अलिगढ तसे कुलूप निर्मितीचे प्रमुख केंद्र. वर्षाकाठी कोट्यवधींची उलाढाल होणाऱ्या या शहरातील कुलूप निर्मितीच्या कामात गुंतलेल्या कामगारांची स्थिती आजही बदललेली नाही.

मथुरा मे नहीं चलता दस का सिक्का -
-    मथुरा शहरात कुठेही जा अन् १० रुपयांचे नाणे द्या कुणी ही घेणार नाही. अगदी भिकारीही नाही. एका हातगाडीवर कुलुपे विकणाऱ्याची एका ग्राहकाशी अशीच हुज्जत सुरू होती. 
-    ‘चाहे कोरट मे जाओ लेकीन ये सिक्का यहा नहीं चलेगा’ असा तो त्या ग्राहकाला ठणकावून सांगत होता. मी म्हटले, हे तर ठीक आहे पण या निवडणुकीत बृजभूमीत कुणाचा सिक्का चालेल. यावर तो म्हणाला, ‘जिसके सिक्के मे आवाज होगी उसी का चलेगा.’
 

Web Title: The subject of law and order is becoming important in the Uttar Pradesh Assembly Election election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.