जमिनीची दुबार विक्री करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 08:20 AM2024-07-23T08:20:14+5:302024-07-23T08:20:22+5:30

विक्री रद्द, खरेदीदार व विक्रेत्याला दहा लाख दंड, गरिबांचे शोषण चिंताजनक

The Supreme Court gave a big blow to those who sold the land twice | जमिनीची दुबार विक्री करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका

जमिनीची दुबार विक्री करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका

- डॉ. खुशालचंद बाहेती  
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जमीन विक्रीचा करार  अमलात आला की, विक्रेत्याचा जमिनीवरील हक्क संपतो असे म्हणत दुबार विक्री करणाऱ्यास आणि खरेदीदाराला दहा लाखांचा दंड ठोठावत एकाच जमिनीची अनेकांना विक्री करणाऱ्यांना  सुप्रीम कोर्टाने दणका दिला.  या निर्णयामुळे शहरात एकच प्लॉट अनेकांना विक्री करणाऱ्या भूमाफीयांच्या कटाला बळी पडलेल्या पीडितांना दिलासा मिळेल.

२ डिसेंबर १९८५ रोजी कौशिक मिश्रा यांनी शेलवली (ता. पालघर, ठाणे) येथे १.५ हेक्टर जमीन खरेदी केली व ताबाही घेतला. ५ डिसेंबर १९८५ रोजी सब-रजिस्ट्रार, पालघर यांच्याकडे विक्री दस्त नोंदणीसाठी सादर केला.  तथापि, मुद्रांक शुल्कातील त्रुटीमुळे करार नोंदणीकृत झाला नाही आणि नोंदणीसाठी प्रलंबित राहिला.  परिणामी त्यांची नावे महसूल अभिलेखात न लागता पूर्वीचेच नाव पुढेही चालू राहिले.

८ जून २०११ रोजी कांजी रावरिया यांनी या जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला.  त्यानंतर कौशिक मिश्रा यांना कळले की, त्याच जमीन विक्रेत्याने ३ डिसेंबर २०१० रोजी कांजी रावरिया यांना  जमीन विकल्याच्या दस्तची नोंदणी झाली आहे. 

मिश्रा यांनी मुद्रांक शुल्कातील त्रुटी दूर केल्यानंतर २ डिसेंबर १९८५ रोजीचा  सादर केलेला विक्री दस्त १४ जून २०११ रोजी सब-रजिस्ट्रारकडे नोंदवण्यात आला. कौशिक मिश्रा यांनी कांजी रावरिया यांचा विक्री दस्त रद्द करण्यासाठी दावा दाखल केला. कोर्टाने म्हटले की, अशा प्रकरणांत न्यायालये केवळ लोकांचे जीवन आणि मालमत्ता हाताळत नाही, तर त्यांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न हाताळत असतात. दस्त नोंदणी झाला नाही म्हणजे विक्री झाली नाही असे नव्हे. नोंदणी न केल्याचा परिणाम इतकाच की, मालमत्ता हस्तांतरण कायदा आणि नोंदणी कायद्यामधील तरतुदींमुळे खरेदीदार पुरावा म्हणून दस्त सादर करू शकत नाही. दुसरा विक्री करार रद्द करत सुप्रीम कोर्टाने विक्रेता आणि खरेदीदाराला १० लाखांचा  दंड ठोठावला. 

सर्वोच्च न्यायालयाची निरीक्षणे...

nकेवळ करार नोंदणीकृत नसल्यामुळे विक्रेता कोणत्याही हक्काचा दावा करू शकत नाही. 
nनंतरच्या खरेदीदाराला आधीच्या विक्रीबद्दल माहिती नसली तरीही त्याला प्रामाणिक खरेदीदार मानले जाऊ शकत नाही.
nआपल्या समाजाची रचनाच अशी आहे की, शक्तिवान कमकुवत लोकांचे शोषण करतात.
nजमिनीची मालकी हा असा आखाडा आहे जिथे सतत सशक्त लोक  गरिबांची फसवणूक करण्यासाठी तलवारी पारजवताना दिसतात. 
nकायदेशीर प्रक्रियेत फेरफार करून दुहेरी फायदा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विक्रेत्यांमुळे सामान्य लोकांना  त्रास सहन करावा लागतो.
nन्याय प्रक्रिया दशकानुदशके लांबते तेव्हा  फसवणुकीचे दु:ख अधिक तीव्र होते.

Web Title: The Supreme Court gave a big blow to those who sold the land twice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.