कोलकाता बलात्कार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल, मंगळवारी होणार सुनावणी...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 05:18 PM2024-08-18T17:18:48+5:302024-08-18T17:19:17+5:30
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठात सुनावणी होणार आहे.
Supreme Court West Bengal Rape Case :पश्चिम बंगालमधील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने देशभरात संतापाची लाट आहे. या घटनेविरोधात देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांचे विद्यार्थीही आंदोलन करत आहेत. दरम्यान, आता या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली असून, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती जेबी पराडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठात मंगळवारी (20 ऑगस्ट 2024) सुनावणी होणार आहे.
प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टवर पाशवी अत्याचाराच्या घटनेने देशातील राजकारण तापले आहे. तसेच, देशभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय महिविद्यालयांचे विद्यार्थी याविरोधात आंदोलन करत आहेत. दरम्यान, 17 ऑगस्ट रोजी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सरन्यायाधीशांना पाठवलेल्या या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेण्याची विनंती करण्यात आली होती.
9 ऑगस्ट रोजी सापडला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह
9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. यानंतर पोलीस दहाच्या सुमारास घटनास्थळी आले. पीडितेच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा होत्या. सुरुवातीला रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी याला आत्महत्या असल्याचे म्हटले होते, परंतु नंतर पोस्टमॉर्टम अहवालात बलात्कार करून हत्या केल्याचे समोर आले.
यानंतर कोलकाता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी संजय रायय याला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्हा मान्य केला. पुढे हे प्रकरण कलकत्ता उच्च न्यायालयात पोहोचले. कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले. या प्रकरणी सीबीआयने आतापर्यंत सुमारे 20 जणांची चौकशी केली आहे. सीबीआयच्या टीमने आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये आणि बाहेर 3D लेझर मॅपिंगची तपासणी केली आहे. दरम्यान, पीडितेला न्याय मिळावा, या मागणीसाठी देशभरातील विविध भागात निदर्शने होत आहेत.