सुप्रीम कोर्ट म्हणाले, आमची कामकाजाची भाषा इंग्रजी, हिंदीतून बाजू मांडणाऱ्या याचिकाकर्त्याच्या मदतीसाठी दिला वकील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 08:55 AM2022-11-19T08:55:04+5:302022-11-19T08:55:42+5:30
Supreme Court : सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरु असताना शुक्रवारी एक याचिकदार वकिलामार्फत नव्हे तर स्वत:च हिंदीमधून आपली बाजू मांडू लागला. परंतु त्यावेळी या न्यायालयाची कामकाजाची भाषा इंग्रजी आहे, असे खंडपीठाने त्याला सांगितले.
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरु असताना शुक्रवारी एक याचिकदार वकिलामार्फत नव्हे तर स्वत:च हिंदीमधून आपली बाजू मांडू लागला. परंतु त्यावेळी या न्यायालयाची कामकाजाची भाषा इंग्रजी आहे, असे खंडपीठाने त्याला सांगितले तसेच त्याला बाजू मांडण्याकरिता वकील उपलब्ध करून दिला.
रोजच्या प्रमाणे सुप्रीम कोर्टाचे कामकाज सुरु होताच शंकरलाल शर्मा या वयोवृद्ध याचिकादाराने त्यांच्या खटल्याचा पुकारा होताच सुप्रीम कोर्टासमाेर स्वत:च हिंदीतून आपली बाजू मांडण्यास सुरूवात केली. मात्र, यावेळी सुप्रीम कोर्टाचे इंग्रजीत सुरू असलेले कामकाज याचिकादाराला कळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर न्या. के. एम. जोसेफ व न्या. हृषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने शंकरलाल शर्मा यांना वकील उपलब्ध करून दिला. न्यायालयाच्या कामकाजाची भाषा इंग्रजी आहे, असे शर्मा यांना खंडपीठाने सांगितले.
याचिकादाराने सुनावणीदरम्यान आपल्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत आपला खटला विविध न्यायालयांत चालला पण मला कुठेही न्याय मिळाला नाही, अशी शंकरलाल शर्मा यांची तक्रार होती. याचिकादार शंकरलाल शर्मा यांच्या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ डिसेंबरला होणार असून वकिलांनी त्यांच्या प्रकरणाचा अभ्यास करून न्यायालयात बाजू मांडावी, असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
प्रकरण गुंतागुंतीचे
n तुमच्या प्रकरणाची फाईल आम्ही वाचली आहे. हे गुंतागुंतीचे प्रकरण असून स्वत: याचिकादार जे सांगत आहे ते नीट समजत नसल्याचे खंडपीठाने सांगितले.
n त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शर्मा यांना वकिलाची मदत उपलब्ध करून दिली.
n त्यानुसार अतिरिक्त सॉलिसिटर जनरल माधवी दिवाण यांनी शंकरलाल शर्मा यांचे म्हणणे ऐकून घेतले व त्याचा अनुवाद करून न्यायालयासमोर याचिकादाराची बाजू मांडली.