मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य आज ठरणार; थोड्याच वेळात सुनावणी सुरु होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 11:15 AM2022-08-23T11:15:53+5:302022-08-23T11:23:07+5:30
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात दुपारी सुनावणी होणार आहे.
नवी दिल्ली/मुंबई- राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यात शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. कोर्टात शिंदे-ठाकरे गटामध्ये न्यायालयीन लढाई सुरू आहे. आज दुपारी १२.३० वाजता महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरण पटलावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे शिंदे सरकारचं भवितव्य आजच्या सुनावणीवर अवलंबून असणार आहे.
शिवसेना आमचीच आहे असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. या कायदेशीर लढाईत शेवटची सुनावणी ४ ऑगस्टला झाली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आधी १२ ऑगस्ट, त्यानंतर २२ आणि आता २३ ऑगस्टला ही सुनावणी होणार आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायाधीश सोमवारी उपलब्ध नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टाच्या यादीनुसार आज (२३ ऑगस्टल) या प्रकरणात सुनावणी होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्षावर दावा सांगितला आहे. उद्धव ठाकरे तसेच शिंदेसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यासंबंधीचे पुरावेही दाखल करण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे गटासंबंधीच्या याचिकांवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी झाल्याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केली होती.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगातून सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या अनेक याचिकांमध्ये आता नागरिकांतर्फे हस्तक्षेप याचिका दाखल करून नागरिक व मतदारांचे म्हणणेसुद्धा एकून घ्यावे, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. याचिकाकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, रंजन बेलखोडे, सौरभ अशोकराव ठाकरे (पाटील) यांनी ॲड. असीम सरोदे यांच्या माध्यमातून दाखल केलेली हस्तक्षेप याचिकेवरही कोर्टात सुनावणी होणार आहे.