शपथविधी झाला, खातेवाटप आटोपलं, आता या तारखेपासून सुरू होणार लोकसभेचं अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 01:29 PM2024-06-12T13:29:32+5:302024-06-12T13:30:10+5:30

Lok Sabha Session Date: अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन २४ जूनला सुरू होणार असून, ते ३ जुलैपर्यंत चालणार आहे. अधिवेशनामध्ये पहिल्या तीन दिवसांत लोकसभेच्या नवनियुक्त सदस्यांचा शपथविधी होईल. त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाईल.  

The swearing-in ceremony was done, the allocation of accounts was over, now the session of the Lok Sabha will start from this date | शपथविधी झाला, खातेवाटप आटोपलं, आता या तारखेपासून सुरू होणार लोकसभेचं अधिवेशन

शपथविधी झाला, खातेवाटप आटोपलं, आता या तारखेपासून सुरू होणार लोकसभेचं अधिवेशन

लोकसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी रविवारी पार पडला. त्यानंतर शपथ घेतलेल्या मंत्र्यांचं खातेवाटपही पूर्ण होऊन त्यांनी आपल्या कामकाजास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता नव्याने अस्तित्वात आलेल्या अठराव्या लोकसभेच्या सदस्यांच्या शपथविधीची तयारी सुरू झाली आहे. अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन २४ जूनला सुरू होणार असून, ते ३ जुलैपर्यंत चालणार आहे. तसेच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतींचं अभिभाषण होईल. तर राज्यसभेचं २६४ वं अधिवेशन २७ जून रोजी सुरू होऊन ३ जुलैपर्यंत चालेल. लोकसभेच्या अधिवेशनामध्ये पहिल्या तीन दिवसांत लोकसभेच्या नवनियुक्त सदस्यांचा शपथविधी होईल. त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाईल.  

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या २७ जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. तसेच या संबोधनामधून राष्ट्रपती पुढील पाच वर्षांसाठीचा सरकारचा आराखडा सदस्यांसमोर मांडतील. याबाबत केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी सोशल मीडियावरून माहिती देताना सांगितले की, अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन हे २४ जून ते ३ जुलै या काळात संपन्न होईल. या दरम्यान, नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांचा शपथविधी, लोकसभा अध्यक्षांची निवड, राष्ट्रपतींचं अभिभाषण आणि त्यावरील चर्चा आदी कार्यक्रम नियोजित आहेत. तर राज्यसभेचं २६४ वं अधिवेशन २७ जून ते ३ जुलै यादरम्यान होईल, अशा माहितीही रिजीजू यांनी दिली. 

२७ जून रोजी होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेमध्ये आपल्या मंत्रिमंडळाची ओळख करून देतील. यादरम्यान, लोकसभेमध्ये विरोधकांचं संख्याबळ वाढलेलं असल्याने आक्रमक विरोधी पक्ष राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावादरम्यान विविध प्रश्नांवरून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे अठरावी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर होणारं संसदेचं पहिलंच अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.  
 

Web Title: The swearing-in ceremony was done, the allocation of accounts was over, now the session of the Lok Sabha will start from this date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.