सर्वात उंच व्यक्ती सपामध्ये दाखल, अखिलेश यांनी केलं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 06:50 AM2022-01-24T06:50:53+5:302022-01-24T06:51:26+5:30
कोविड आचारसंहिता गुंडाळून होतोय प्रचार
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : ओमायक्रॉनच्या सामुदायिक फैलावाबद्दल केंद्र सरकारने दिलेल्या इशाऱ्यानंतरही राजकीय पक्षांवर निवडणूक प्रचाराबाबत काही परिणाम होताना दिसत नाही. उत्तर प्रदेशमध्ये गाजियाबादमध्ये १० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ घरोघर जाऊन प्रचारासाठी निघाले तेव्हा लोकांचा मोठा जमाव निवडणूक आयोगाने सांगितलेली आचारसंहिता बाजूस सारून त्यांच्यासोबत चालत होता. मोठी पोलीस संख्या असूनही व मोठे अधिकारी असतानाही कोणताही गुन्हा नोंद झाला नाही. ही परिस्थिती फक्त गाजियाबादेतील नाही. पश्चिम उत्तर प्रदेशच्या कैरानात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचारासाठी निघाले तेव्हा त्यांनी स्वत:च तसेच त्यांच्यासोबत निघालेल्या लोकांनी मास्क घातलेला नव्हता. भाजपचे सगळे उमेदवार रात्री अंधारात मोठ्या संख्येने मिरवणूक काढत आहेत.
सर्वात उंच असल्याचा दावा करणारे ४६ वर्षीय धर्मेंद्र प्रताप यांचे सपामध्ये अध्यक्ष अखिलेश यादव यांनी स्वागत केले, ते फोटोही सोशल मीडियातून शेअर झाले आहेत.
अमरिंदर सिंग पटियालातून, 22 उमेदवार जाहीर
चंदीगड : पंजाब लोक काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग पटियाला शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. सिंग यांनी रविवारी आपल्या पक्षाचे २२ उमेदवार जाहीर केले. भाजप आणि माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंह ढिंढसा यांच्या संयुक्त अकाली दलासोबत ते निवडणूक लढवत आहेत. युतीनुसार भाजपने ३५, तर संयुक्त अकाली दलाने १४ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी पंजाब लोक काँग्रेसची स्थापना करून भाजपशी युती केली. त्यानुसार त्यांच्या पक्षाला ३८ जागा मिळाल्या आहेत.
सिंग यांनी घोषित केलेल्या उमेदवारांत नऊ जाट शीख, चार अनुसूचित जाती, तीन मागासवर्गीय, सहा हिंदू आणि एक मुस्लीम आहे.