करार संपला तरी भाडेकरू फ्लॅट रिकामा करेना, वृद्ध मालक दाम्पत्य राहतेय पायऱ्यांवर; पोलीस म्हणतात कोर्टाचा आदेश हवा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 01:03 PM2022-07-26T13:03:11+5:302022-07-26T13:05:45+5:30
भाडेकरू असलेल्या महिलेने फ्लॅट रिकामा करण्यास नकार दिला आहे. मात्र, भाडेकरार संपून एक महिना उलटला आहे.
कायद्याने फ्लॅट मालक तसेच भाडेकरूंनाही काही अधिकार दिले आहेत. परंतू, त्याचा गैरवापर होताना दिसत आहे. असाच एक प्रकार ग्रेटर नोएडाच्या एका हाऊसिंग सोसाटीमध्ये घडला आहे. यामुळे मालक असूनही वृद्ध दाम्पत्याला घराबाहेरील पायऱ्यांवर रहावे लागत आहे.
भाडेकरू असलेल्या महिलेने फ्लॅट रिकामा करण्यास नकार दिला आहे. मात्र, भाडेकरार संपून एक महिना उलटला आहे. तरी ती फ्लॅट खाली करणार नाही, असे दटावत आहे. पोलिसांनीही बघ्याची भूमिका घेतली आहे. मुंबईत राहणाऱ्या सुनील कुमार आणि राखी गुप्ता या दाम्पत्याने निवृत्तीनंतरचे आयुष्य जगण्यासाठी नोएडाच्या सेक्टर 16 मधील श्रीराधा स्काय गार्डन सोसायटीमध्ये घर घेतले होते. निवृत्तीला वेळ असल्याने त्यांनी ते घर भाड्याने दिले होते. १९ जुलैला हे दाम्पत्य तिथे पोहोचले. तेव्हापासून ते पायऱ्यांवर राहत आहेत.
भारत पेट्रोलिअममध्ये कुमार हे काम करत होते. ते निवृत्त झाले आहेत. नोएडाला गेल्यावर ते दोन दिवस नातेवाईकांकडे राहिले. त्यांच्या फ्लॅटवर ३५ वर्षीय घटस्फोटीत महिलेने कब्जा केला आहे. कुमार यांच्या म्हणण्यानुसार या महिलेला त्यांनी गेल्या वर्षी ११ महिन्यांच्या करारावर फ्लॅट भाड्याने दिला होता. तेव्हाच तिला याची कल्पना दिली होती की ती ११ महिनेच राहू शकते, यानंतर आम्ही रहायला येणार आहोत.
महिला भाडेकरू पतीपासून वेगळी राहते. तिच्यासोबत तिचा मुलगा असतो. घर खाली करण्यासाठी आठवण म्हणून तिला कुमार यांनी १९ एप्रिलला मेसेज देखील केला होता. तेव्हा तिला १० जूनला भाडेकरार संपत असून घर खाली करण्याचे कळविले होते. तेव्हा तीने हो असा मेसेज केला होता. मात्र, त्यानंतर तिने त्यांचा कॉल आणि मेसेजला रिप्लाय देणे बंद केले. काही दिवसांनी तिने तिच्या मुलाला बरे नव्हते असे कारण दिले.
तिथे परिस्थिती पाहण्यासाठी नोएडामध्येच राहणारी कुमार यांची मेहुणी २२ जूनला गेली होती. तिचा अपमान करून तिला तिथून त्या महिलेने हाकलले. यानंतर कुमार स्वत: मुंबईहून नोएडाला आपल्या फ्लॅटवर गेले त्यांनाही त्या महिलेने नकार दिला. पोलिसांनीही कारवाई करण्यास नकार दिला. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे ते गेले. त्यांनी पोलीस आयुक्तांना तक्रार पाठवत अ्सल्याचे सांगितले. मात्र, अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. न्यायालयाच्या आदेशाशिवाय आम्ही कारवाई करू शकत नाही, असे डीसीपींनी सांगितले आहे.
दुसरीकडे महिलेने फ्लॅट न सोडण्याचे कारण सांगितले आहे. सोसायटीचे लोक तिच्याबाबत काहीही बोलत असतात, अफवा पसरवत असतात. यामुळे त्या लोकांनी माफी मागावी आणि त्याचा व्हिडीओ बनवावा, तेव्हाच मी हा फ्लॅट सोडेन असे तिचे म्हणणे आहे.