तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 06:08 AM2024-11-18T06:08:18+5:302024-11-18T06:09:32+5:30

या हिंसक आंदोलनादरम्यान जमावाने राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित घरावर हल्ल्याचा प्रयत्न केला.

The tension increased! In Manipur, 'NPP' withdraws government's support; Congress MLAs are preparing to resign | तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी

तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी

इंफाळ : बेपत्ता झालेल्या सहा जणांचे मृतदेह आढळल्यानंतर अशांत मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला. या हिंसाचारादरम्यान जामावाने दहा आमदारांच्या घरावर हल्ला करत चार आमदारांच्या घरांना आग लावली. आगीत भाजपाच्या तीन, तर काँग्रेसच्या एका आमदाराच्या घराचे नुकसान झाले. 

या हिंसक आंदोलनादरम्यान जमावाने राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित घरावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत तो परतवून लावल्याने मोठा अनर्थ टळला. 

दरम्यान, मणिपूरमध्ये परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात भाजपच्या नेतृत्त्वातील सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका करून नॅशनल पीपल्स पार्टीने मणिपूरमध्ये सरकारचा पाठिंबा काढल्याचे जाहीर केले. याशिवाय काँग्रेसच्याही सर्व आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. 

६० सदस्य असलेल्या विधानसभेत ‘एनपीपी’चे ७ आमदार तर भाजपचे ३७ आमदार आहेत. पाठिंबा काढल्यानंतरही सरकारकडे ४६ आमदार आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील प्रचार सभा रद्द केल्या असून, ते राजधानी दिल्लीत परतले आहेत. ईशान्येकडील राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

अनेक जिल्ह्यांत कर्फ्यू, इंटरनेट सेवा बंद

- सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यासाठी इंफाळ पूर्व व पश्चिम, बिष्णूपूर, थौबल व काकचिंग जिल्ह्यांत प्रशासनाने अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू केला आहे. 

- मंत्री व आमदारांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर प्रशासनाने सात जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे.

‘अफप्सा हटवा’ 

अतिरेकी संघटनांवर २४ तासांमध्ये कारवाई करण्यासोबत सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा अर्थात अफप्सा हटवण्याची मागणी इंफाळ खोऱ्यातील संघटनांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ‘मणिपूर अखंडता समन्वय समिती’ने केली आहे.  

युवकांच्या शवविच्छेदन अहवालाची मागणी

चकमकीत ठार झालेल्या १० युवकांचा शवविच्छेदन अहवाल त्यांच्या नातेवाइकांना मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका कुकी समुदायाच्या  संघटनेने घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ जमावाला रोखले

इंफाळ पूर्व क्षेत्रातील लुवांगसांगबाम येथे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित घरावर हल्ला करण्यासाठी जमाव चाल करून गेला. 

मात्र, सुरक्षा दलाने जमावाला मुख्यमंत्र्यांच्या घरापासून १०० ते २०० किलोमीटरवर थांबवले. मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ मन्त्रीपुखरी भागात उशिरापर्यंत निदर्शने सुरू होती.

Web Title: The tension increased! In Manipur, 'NPP' withdraws government's support; Congress MLAs are preparing to resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.