सात राज्यांमध्ये राज्यपाल बदलणार?; हालचालींना वेग, मंत्रिमंडळात फेरबदलाचीही चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 09:16 AM2022-08-17T09:16:09+5:302022-08-17T09:16:16+5:30
पाच राज्यपाल आणि दोन नायब राज्यपाल यांचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली- राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुका आणि स्वातंत्र्य दिन समारंभ पार पडल्यानंतर आता राज्यपाल बदलांबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. मंत्रिमंडळात फेरबदलाचीही चर्चा आहे. मात्र पक्ष त्यासाठी आणखी वेळ घेऊ शकतो. पाच राज्यपाल आणि दोन नायब राज्यपाल यांचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे. ज्येष्ठ नेत्यांना राज्यपाल आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना नायब राज्यपाल म्हणून नियुक्त करण्याला पंतप्रधान पसंती देतात.
अलीकडेच व्ही.के.सक्सेना यांची दिल्लीत नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. ज्या नावांचा सध्या विचार केला जात आहे, त्यात माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचा समावेश आहे. राज्यपालांच्या यादीत प्रथम क्रमांकावर नाव आहे सत्यपाल मलिक यांचे. ते सध्या मेघालयात आहे. त्यांना गोव्यातून मेघालयात पाठवण्यात आले आङे. तेव्हापासून ते दिल्लीतील मेघालय भवनमध्येच आहेत. त्यांना ऑक्टोबर २०१७मध्ये बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले होते. त्यांना जम्मू-काश्मिरातही पाठविण्यात आले होते. इतिहासातील ते असे एकमेव राज्यपाल आहेत, जे सातत्याने केंद्र सरकारविरुद्ध जाहीर भाष्य करीत आलेले आहेत. तरीही पंतप्रधानांनी त्यांना बडतर्फ केले नाही.
अरुणाचलचे बी.डी.मिश्रा, आसाम व नागालँडचे जगदीश मुखी, पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदाची जबाबदारी असलेल्या तमिलसाई सुंदरराजन आणि अंदमान-निकोबारचे डी.के. जोशी यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे. बनवारीलाल पुरोहित यांना ऑक्टोबर २०१७मध्ये तामिळनाडूचे राज्यपाल करण्यात आले आणि नंतर पंजाबला स्थलांतरित करण्यात आले. त्यांना कायम ठेवले जाऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले.