मतदानाचा मुहूर्त ठरला; ४ जूनला होणार फैसला! देशात ७ तर महाराष्ट्रात ५ टप्प्यांत होणार मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 07:21 AM2024-03-17T07:21:10+5:302024-03-17T07:21:35+5:30
यावेळी ४ राज्यांतील विधानसभा व विविध राज्यांतील विधानसभेच्या २६ जागांसाठी पोटनिवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या देशाच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून ५४३ जागांसाठी १९ एप्रिल ते १ जून या काळात सात टप्प्यांमध्ये मतदानाचा महामहोत्सव पार पडणार आहे. ९७ कोटी मतदार देशात सत्तेत कोण असेल, याचा फैसला घेईल आणि त्याचा निकाल लागेल तो ४ जून रोजी. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपचे इलेक्शन मॅनेजमेंट, लोकप्रियता अन् दुसरीकडे राहुल गांधी यांच्यासोबत असलेल्या इंडिया आघाडीची एकमूठ यांची आजपासून ८३ दिवस सत्वपरीक्षा होणार आहे.
शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दुपारी ३ वाजता लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत घेतोय, तुम्हीही मतदानासाठी या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी ४ राज्यांतील विधानसभा व विविध राज्यांतील विधानसभेच्या २६ जागांसाठी पोटनिवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेबरोबरच संपूर्ण देशभरात आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून, आता खऱ्या अर्थाने रणधुमाळीला सुरुवात झाली असून, कोणाची ‘लाट’ येते आणि कोणाला ‘न्याय’ मिळतो, हे ४ जूनला समजेल.
लोकशाहीचा महोत्सव
- १९ एप्रिलला पहिला तर १ जूनला अंतिम टप्पा
- दिव्यांग, ८५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी घरून मतदानाची सोय
- मतदान केंद्रांवर स्वयंसेवक, व्हीलचेअर्स
- ‘मनी पॉवर’चा वापर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना
- राजकीय पक्ष आणि वाचाळवीरांसाठी नियमावली जाहीर
- अफवा, चुकीची माहिती पसरविल्यास कठोर कारवाई
- तक्रार मिळताच १०० मिनिटांत पथक पोहोचेल घटनास्थळी
- १२ राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त
- आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल, सिक्कीममध्ये सोबतच विधानसभाही
- देशातील २६ विधानसभा पोटनिवडणुकांचेही मतदान
कधी होणार, कुठे मतदान?
- टप्पा १ - १९ एप्रिल - राज्य २१ / केंद्रशासित प्रदेश १०२
राज्य आणि मतदारसंघ - महाराष्ट्र - ५ , मध्य प्रदेश - ६, छत्तीसगड - १, तामिळनाडू - ३९, लक्षद्वीप - १, राजस्थान - १२, उत्तराखंड - ५, उत्तर प्रदेश - ८, जम्मू-काश्मीर - १, पश्चिम बंगाल - ३, सिक्किम - १, मेघालय - २, अरुणाचल प्रदेश - २, नागालँड -१, मणिपूर - २, मिझाेराम - १, त्रिपुरा -१, आसाम - ५, बिहार - ४, अंदमान आणि निकाेबार - १, पुडुच्चेरी - १.
- टप्पा २ - २६ एप्रिल - राज्य १३ / केंद्रशासित प्रदेश ८९
राज्य आणि मतदारसंघ - महाराष्ट्र - ८, मध्य प्रदेश - ७, छत्तीसगड - ३, केरळ - २०, कर्नाटक - १४, राजस्थान - १३, जम्मू-काश्मीर - १, उत्तर प्रदेश - ८, बिहार - ५, पश्चिम बंगाल - ३, आसाम - ५, मणिपूर - १, त्रिपुरा - १.
- टप्पा ३ - ७ मे - राज्य १२ / केंद्रशासित प्रदेश ९४
राज्य आणि मतदारसंघ - महाराष्ट्र - ११, गाेवा - २, कर्नाटक - १४, गुजरात - २६, दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव - २, मध्य प्रदेश - ८, छत्तीसगड - ७, उत्तर प्रदेश - १०, जम्मू-काश्मीर - १, बिहार - ५, पश्चिम बंगाल - ४, आसाम - ४.
- टप्पा ४ - १३ मे - राज्य १० / केंद्रशासित प्रदेश ९६
राज्य आणि मतदारसंघ - महाराष्ट्र - ११, मध्य प्रदेश - ८, तेलंगणा - १७, आंध्र प्रदेश - २५, ओडिशा - ४, जम्मू-काश्मीर - १, उत्तर प्रदेश - १३, बिहार - ५, झारखंड - ४, पश्चिम बंगाल - ८.
- टप्पा ५ - २० मे - राज्य ८ / केंद्रशासित प्रदेश ४९
राज्य आणि मतदारसंघ - महाराष्ट्र - १३, उत्तर प्रदेश - १४, जम्मू-काश्मीर - १, लडाख - १, ओडिशा - ५, झारखंड - ३, पश्चिम बंगाल - ७, बिहार - ५.
- टप्पा ६ - २५ मे - राज्य ७ / केंद्रशासित प्रदेश ५७
राज्य आणि मतदारसंघ - उत्तर प्रदेश - १४, हरयाणा - १०, ओडिशा - ६, पश्चिम बंगाल - ८, झारखंड - ४, बिहार - ८, दिल्ली - ७.
- टप्पा ७ - १ जून - राज्य ८ / केंद्रशासित प्रदेश ५७
राज्य आणि मतदारसंघ - उत्तर प्रदेश - १३, ओडिशा - ६, पश्चिम बंगाल - ९, बिहार - ८, झारखंड - ३, पंजाब - १३, हिमाचल प्रदेश - ४, चंडिगड - १.