Earthquake: अमरनाथमधील ढगफुटीनंतर आणखी एक संकट; जम्मू-काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 10:03 AM2022-07-09T10:03:12+5:302022-07-09T10:06:13+5:30
अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्याने १५ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर भूकंपाच्या धक्क्यांमुळे जम्मू-काश्मीरमधील परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नवी दिल्ली ।
जम्मू-काश्मीरमध्ये निसर्गाचे तांडव सुरूच आहे. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्यानंतर इथे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सुदैवाने भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही मात्र यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. लक्षणीय बाब म्हणजे ढगफुटी आणि भूकंपाचे धक्के एकाचवेळी जाणवले असल्याचे बोलले जात आहे. माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी ५.२१ च्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
शुक्रवारी अपघातांचा कहर
दरम्यान, शुक्रवारी अपघातामुळे काही लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्याने १५ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर भूकंपाच्या धक्क्यांमुळे जम्मू-काश्मीरमधील परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीमुळे तेथील टेंटही वाहून गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफच्या तुकडी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्यास सुरूवात केली. भाविकांना धोक्याच्या ठिकाणावरून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
ITBP च्या जवानांनी अमरनाथ गुहेजवळील प्रभावित ठिकाणांवर बचावकार्य सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार १५ लोकांचा मृत्यू झाला असून ४८ जण जखमी झाले आहेत. एका भाविकाने सांगितले की, "आम्हाला आता यात्रेसाठी पुढे जाऊ दिले जात आहे. सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. आता आम्ही ठीक आहोत, बाबा सर्वांचे रक्षण करतील. मात्र काल झालेल्या घटनेमुळे दु:ख झाले आहे."