पाण्यावर चालणाऱ्या महिलेचं सत्य आलं समोर? लोकांनी उगीच घातला गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 06:06 PM2023-04-10T18:06:23+5:302023-04-10T18:24:31+5:30
सोशल मीडियावर गेल्या ३ दिवसांपासून या महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सध्या साधू महाराज आणि बाबा लोकांची सोशल मीडियावरही चागंलीच क्रेझ पाहायला मिळते. या बाबा लोकांचे भक्त पाहून अनेकजण त्यांचे फॉलोवर्स होतात. तर काहीजण त्यांना ट्रोलही करतात. त्यामुळे, सोशल मीडियातून हे लोक सर्वदूर पोहचतात. मात्र, सर्वसामान्य लोकं किती सहजपणे अंधश्रद्धेला बळी पडतात हेही या घटनांतून समोर येते. नुकतेच एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, ही महिला चक्क पाण्यावर चालत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे जेव्हा ही महिला पाण्यातून बाहेर येते, तेव्हा लोकं तिचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. तसेच, तिला देवाची अवतारही मानू लागता. मात्र, या महिलेनेच ही गोष्ट नाकारली.
सोशल मीडियावर गेल्या ३ दिवसांपासून या महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र, स्वत: महिलेनेच या व्हिडिओचं सत्य सांगितल्याने लोकांची अंधश्रद्धा उघडी पडली. मी सर्वसाधारण महिला असून माझ्याकडे कुठलीही दैवी शक्ती नाही. मला कुठलीही सिद्धी प्राप्त नसून जिथे कमी पाणी असते तिथून मी चालत जाते. माझा व्हायरल व्हिडिओ झालाय, त्या जागेवर पाणी कमी होते, म्हणून मी तेथून चालत नदीबाहेर आले, असे ५१ वर्षीय ज्योती रघुवंशी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले.
जिसे देवी मानकर पूज रहे थे,उसने खोली हकीकत...नर्मदा परिक्रमा पर निकली बुजुर्ग महिला ने कहा कि वह कोई देवी नहीं है.पानी मे चलने का वीडियो भ्रामक.@ABPNews@abplive@brajeshabpnews@Manish4allpic.twitter.com/uiHTV7dbIw
— AJAY TRIPATHI (ABP NEWS) (@ajay_media) April 9, 2023
संबंधित महिलेचे मानसिक संतुलन ठिक नसून गेल्या काही महिन्यांपासून ती घरातून निघून गेली होती. कुटुंबीय महिलेचा शोध घेत होते, पण त्याच दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कुटुंबीय जबलपूरला पोहोचले.
दरम्यान, या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नर्मदा यात्रा करण्यासाठी ही महिला निघाली असून ती पाण्यावर चालते अशी अफवा सर्वत्र पसरली होती. त्यामुळे, महिलेच्या दर्शनासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली होती. अखेर, पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं असून कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू होती.