राष्ट्रपतींना मिळणारी मतं 'या' पेटीत बंद होणार..!, वाचा कशी असते प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 08:17 AM2022-07-13T08:17:22+5:302022-07-13T08:18:47+5:30
राष्ट्रपती निवडणूक १८ जुलै रोजी होणार असून, भारत निवडणूक आयोगाकडून निर्धारित मतपेट्या, मतपत्रिका, विशेष लेखण्या आणि इतर सीलबंद निवडणूक साहित्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
राष्ट्रपती निवडणूक १८ जुलै रोजी होणार असून, भारत निवडणूक आयोगाकडून निर्धारित मतपेट्या, मतपत्रिका, विशेष लेखण्या आणि इतर सीलबंद निवडणूक साहित्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना हे साहित्य निर्धारित वेळेत पाठवण्याची प्रक्रिया पार पाडली जात आहे. हे साहित्य दिल्लीसह पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेश आणि सर्व विधानसभा सचिवालयांना पाठविण्यात येत आहेत. सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयातून हे साहित्य ताब्यात घेणे आयोगाने बंधनकारक केले आहे. यात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
कसे आणले जाते साहित्य?
- निवडणूक झाल्यानंतर सीलबंद मतपेट्या इतर साहित्यासह लगेचच उपलब्ध असलेल्या विमानाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे (राज्यसभा सचिवालयाकडे) पाठविण्यात येतील.
- पेट्या आणि इतर कागदपत्रे वैयक्तिक देखरेखीखालीच नेण्यात येणार असून, त्या हवाई प्रवासातही नजरेआड होणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाईल.
कशी असते प्रक्रिया?
- नवी दिल्लीच्या निर्वाचन सदनमध्ये संपूर्ण तपासणीनंतर सुयोग्य सुरक्षा व्यवस्थेसह मतपेट्यांसह सर्व आवश्यक निवडणूकविषयक साहित्य सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले जाते. यावेळी दिल्ली पोलिसांची पथके त्यांच्यासमवेत जातात.
- साहित्य ताब्यात घेतल्यावर त्याच दिवशी हे सर्व सहायक निवडणूक अधिकारी त्यांच्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात पोहोचतात. मतपेट्या स्वतंत्र हवाई तिकिटावर विमानातील पहिल्या रांगेत अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक देखरेखीखाली नेल्या जातात.