रामलला आज हाेणार विराजमान; दुपारी १२.२० वाजता प्राणप्रतिष्ठा, देशभरात दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 06:50 AM2024-01-22T06:50:55+5:302024-01-22T09:28:06+5:30

आज लिहिला जाईल इतिहास...

The wait for the much awaited pranapratistha ceremony of Lord Shri Ram is just a matter of moments. | रामलला आज हाेणार विराजमान; दुपारी १२.२० वाजता प्राणप्रतिष्ठा, देशभरात दिवाळी

रामलला आज हाेणार विराजमान; दुपारी १२.२० वाजता प्राणप्रतिष्ठा, देशभरात दिवाळी

-त्रियुग नारायण तिवारी

अयोध्या : प्रभू श्रीरामांच्या बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतीक्षा अवघ्या काही क्षणांपुरती राहिली आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नववधूप्रमाणे सजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. २२) दुपारी १२:२० वाजता रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ऐतिहासिक सोहळ्यासाठी देश-विदेशातील मंदिरांमध्ये उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.  सोहळ्यानंतर सायंकाळी देशभरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. 

कसा असेल मुख्य सोहळा? 

  • सकाळी १०:३० वाजल्यापासून निमंत्रितांचे मंदिर परिसरात आगमन होण्यास सुरुवात होईल. केवळ निमंत्रण असलेल्यांनाच मंदिर परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे.
  • प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा १२:२० वाजता सुरू होईल. अभिजित मुहूर्तावर होणाऱ्या मुख्य पूजेसाठी १२ वाजून २९ मिनिटे व ८ सेकंद ते १२ वाजून ३० मिनिटे व ३२ सेकंदांपर्यंतचा ८४ सेकंदांचा शुभ मुहूर्त आहे.
  • वाराणसीचे आचार्य गणेश्वर द्रविड व आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वात व १२१ पुरोहित आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत  रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलल्लांच्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील वस्त्र काढतील, त्यानंतर डोळ्याला काजळ लावतील, तसेच मूर्तीला सुवर्णवस्त्र परिधान करतील.
  • दुपारी एक वाजता सर्व पूजा-विधी पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील.
  • सायंकाळी अयोध्यानगरी  १० लाख पणत्यांनी उजळून निघणार आहे. 

६ दिवसांचे विधी संपन्न

अयोध्येत १६ जानेवारीपासून सुरू झालेले सहा दिवसांचे विधी रविवारी पूर्ण झाले. सकाळी ११४ कलशांतील जलाने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मध्याधिवास, शय्याधिवास विधी झाले.

महाराष्ट्रातील रोपांची सजावट

श्रीराम जन्मभूमी संकुलात महाराष्ट्रातून आणलेली विविध फुलांची साडेसात हजार रोपे लावण्यात आली. नक्षत्र वाटिकेत २७ नक्षत्रांशी संबंधित २७ झाडे लावण्यात आली आहे.

राज्यातील आजची सुट्टी उच्च न्यायालयाने केली ओके

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २२ जानेवारी रोजी राज्य सरकारने जाहीर केलेल्या सुट्टीविरोधात कायद्याचा अभ्यास करणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी दाखल केलेली जनहित याचिका राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने ती फेटाळली. सुट्टी हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला.

Web Title: The wait for the much awaited pranapratistha ceremony of Lord Shri Ram is just a matter of moments.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.