संगमावरील पाणी अल्कलाईन एवढे शुद्ध; प्रयागराज महाकुंभच्या प्रदुषणावर पद्मश्री डॉ.अजय सोनकर यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 14:03 IST2025-02-21T14:02:46+5:302025-02-21T14:03:04+5:30
संगम, अरैलसह पाच घाटांवरील पाण्याचे नमुने टेस्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

संगमावरील पाणी अल्कलाईन एवढे शुद्ध; प्रयागराज महाकुंभच्या प्रदुषणावर पद्मश्री डॉ.अजय सोनकर यांचा दावा
काही दिवसांपूर्वी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने एनजीटीला अहवाल सोपविला होता, महाकुंभमधील संगमावरच्या पाण्यात फेकल कोलिफॉर्म बॅक्टेरिया सापडल्याचे यात म्हटले होते. यामुळे हे पाणी अंघोळीसाठी किंवा पिण्यासाठी लायक नसल्याचे म्हटले होते. या गंगाजलाच्या शुद्धतेवर प्रश्न उपस्थित केले जात असताना आता पद्मश्री डॉ. अजय सोनकर यांनी गंगाजलाचे परीक्षण केले आहे. यामध्ये गंगाजल अंघोळ करण्यासच योग्य नाही तर अल्कलाईन पाण्याएवढे शुद्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
संगम, अरैलसह पाच घाटांवरील पाण्याचे नमुने टेस्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. ५७ कोटी लोक अंघोळ करून गेले तरी या पाण्याच्या शुद्धतेत काही फरक पडला नसल्याचे ते म्हणाले आहेत. सोनकर यांनी त्यांच्या नैनी येथील लॅबमध्ये हे परीक्षण केले आहे. या पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना त्यांनी आपल्या प्रयोगशाळेत येऊन टेस्टिंग करण्याचे आव्हानही दिले आहे.
तीन महिन्यांच्या सतत संशोधनातून गंगेचे पाणी सर्वात शुद्ध असल्याचे सिद्ध झाले आहे. येथे आंघोळ केल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ शकत नाही. बॅक्टेरियोफेज (जीवाणू खाणारा) असल्यामुळे गंगेच्या पाण्याची शुद्धता अबाधित राहते, असा दावा त्यांनी केला आहे. पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत १४ तास ठराविक तापमानावर ठेवल्यानंतरही त्यात विषाणूंची वाढ झालेली नाही. गंगाजल केवळ आंघोळीसाठी सुरक्षित नाही, तर त्याच्या संपर्कात आल्याने त्वचेचे आजारही होत नाहीत, असे ते म्हणाले.
कोट्यवधी भाविकांनी स्नान केले असूनही, पाण्यात बॅक्टेरियाची वाढ झाली नाही किंवा पाण्याच्या पीएच पातळीत कोणतीही घट झाली नाही, असे यात दिसले आहे. गंगेच्या पाण्यात ११०० प्रकारचे बॅक्टेरियोफेज असतात. जे कोणत्याही हानिकारक जीवाणूंचा नाश करतात. यामुळे हे पाणी प्रदुषित झाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. गंगेच्या पाण्याची आम्लता (पीएच) सामान्यपेक्षा चांगली होती आणि त्यात कोणताही दुर्गंधी किंवा बॅक्टेरियाची वाढ आढळली नाही. पीएच पातळी देखील ८.४ ते ८.६ दरम्यान आढळून आल्याचे ते म्हणाले.
सोनकर हे प्रयागराजच्या नैनीचे राहणारे आहेत. कृत्रिमरित्या मोती वाढवून त्यांनी मोठी क्रांती केली होती. यामुळे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.