धक्कादायक! लग्नात गिफ्ट आलेलं म्युझिक सिस्टीम सुरू करताच स्फोट, २ ठार ४ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 06:02 PM2023-04-04T18:02:01+5:302023-04-04T18:02:31+5:30
घरात लग्नाचं गिफ्ट उलघडल्यानंतर, ते होम थिएटर सुरु करताच मोठा धमाका झाला.
लग्नात नातेवाईक, पै. पाहुणे आणि मित्रमंडळींकडून भेटवस्तू देण्यात येतात. या भेटवस्तू मोठ्या हौसेनं दिल्या जातात, त्यामुळे नवरा-नवरीलाही या भेटवस्तुंचं कुतूहल असतं. मात्र, याच कुतूहलपोटी मिळालेल्या गिफ्टचा वापर करताना स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. छत्तीसगढच्या कबीरधाम जिल्ह्यातून यासंदर्भातील घटना समोर आली आहे. लग्नात गिफ्ट मिळालेल्या म्युझिक सिस्टीमचा स्फोट होऊन युवक आणि त्याच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच या युवकाचं लग्न झालं होतं.
घरात लग्नाचं गिफ्ट उलघडल्यानंतर, ते होम थिएटर सुरु करताच मोठा धमाका झाला. त्यामध्ये, २ जणांचा मृत्यू झाला तर ४ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी तात्काळ पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं आहे. रेंगाखार परीक्षेत्रातील चमारी गावात सोमवारी ही घटना घडली. या म्युझिक सिस्टीमच्या स्फोटाचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही. मात्र, या शक्तीशाली स्फोटामुळे घराच्या भीतीही पडल्या आहेत.
रेगाखार हा रायपूरपासून २०० किमी दूर छत्तीडगडच्या-मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर असलेला नक्षलवादी प्रदेश आहे. विशेष म्हणजे हेमेंद्र मरावी यांच १ एप्रिल रोजीच लग्न झालं होतं. कबिरधामचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनिषा ठाकूर यांनी सांगितलं की, सोमवारी नवरदेवासह घरातील इतर सदस्यही लग्नात मिळालेले गिफ्ट खोलून पाहत होते. त्याचवेळी, गिफ्ट मिळालेलं म्युझिक सिस्टीम सुरू करण्यासाठी इलेक्ट्रीक बोर्डमध्ये वायर टाकून ऑन केले. त्याचक्षणी म्युझिक सिस्टीमचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात नवरदेवाचा जागीच मृत्यू झाला. तर, नवरदेवाच्या भावासह ५ जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी, नवरदेवाच्या भावाचेही रुग्णालयात निधन झाले.
दरम्यान, पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे खोलीत कुठलाही ज्वलनशील पदार्थ आढळून आला नाही.