"सारा देश आप पर गर्व करेगा"; PM मोदी यांचा थेट संदेशखली पीडिता भाजप उमेदवार रेखा पात्रा यांना फोन, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 18:51 IST2024-03-26T18:50:59+5:302024-03-26T18:51:53+5:30
Lok Sabha Chunav 2024: रेखा पात्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रभू रामचंद्रांचे प्रतीक म्हणत, त्यांचा हात डोक्यावर असल्याने आपल्याला मोठा अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. तसेच, आपला लढा कुण्या पक्षाचा नाही, तर बशीरहाटमधील सर्व पीडितांचा लढा आहे, असेही रेखा यांनी म्हटले आहे.

"सारा देश आप पर गर्व करेगा"; PM मोदी यांचा थेट संदेशखली पीडिता भाजप उमेदवार रेखा पात्रा यांना फोन, म्हणाले...
संदेशखलीतील महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर थेट ममता सरकारविरोधात लढा उभारणाऱ्या आणि आता लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवार असलेल्या रेखा पात्रा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच फोनवरून संवाद साधला. यावेळी रेखा पात्रा यांना शक्तिस्वरूपा म्हणत, संपूर्ण देशाला आपला अभिमान वाटेल, असे मोदी यांनी म्हटले आहे. तर, रेखा पात्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रभू रामचंद्रांचे प्रतीक म्हणत, त्यांचा हात डोक्यावर असल्याने आपल्याला मोठा अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. तसेच, आपला लढा कुण्या पक्षाचा नाही, तर बशीरहाटमधील सर्व पीडितांचा लढा आहे, असेही रेखा यांनी म्हटले आहे.
बशीरहाटमधून भाजपनं दिली उमेदवारी -
भारतीय जनता पक्षाने रेखा पात्रा यांना पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. संदेशखली येथील टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांपैकी त्या एक आहेत. पंतप्रधान मोदी यांनी त्यांना शक्तीस्वरूपा असे संबोधत, त्यांच्या निवडणुकीच्या तयारीसंदर्भात विचारणा केली. तसेच तिकीट मिळाल्यानंतर आजूबाजूचे वातावरण, लोकांच्या प्रतिक्रिया यासंदर्भातही रेखा पात्रा यांच्यासोबत चर्चा केली.
'TMC च्या लोकांनी माफी मागितली' -
भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर शेजारील लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या, असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी विचारला असता, रेखा पात्रा म्हणाल्या, अनेकांनी फोन आणि व्हिडिओ कॉल करून अभिनंदन केले. टीएमसीतीलही अनेकांचे फोन आले. संदेशखलीतील अत्याचाराबद्दल त्यांनी माफीही मागितली आणि पक्षातील वरिष्ठांच्या सांगण्यावरून आपण असे केल्याचेही सांगितले. भाजपची उमेदवारी मिळाल्याबद्दल त्यांनीही रेखा यांचे अभिनंदन केले आहे.
'सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणार' -
रेखा पात्रा म्हणाल्या, अत्याचार करणारे लोक आपल्या ओळखीचेच आहेत. हे सर्व त्यांनी टीएमसीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून केले. आपल्या मनात त्यांच्याबद्दल कसलाही राग नाही. सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढणार आहोत. यावर पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आणि आजच्या राजकीय युगात, ज्यांनी तुमचे नुकसान केले, त्यांच्या भल्यासाठीही कामना करणे, असे फार कमी बघायला मिळते. तसेच, आपण गौरवशाली इतिहास घडवणार आहात, अशा शुभेच्छाही पंतप्रधान मोदी यांनी रेखा पात्रा यांना दिल्या.