चक्क पत्नी देणार पतीला 5 हजार पोटगी; पत्नीने आत्महत्येची धमकी देत केले लग्न, शिक्षण सोडावे लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 06:34 AM2024-02-24T06:34:13+5:302024-02-24T06:35:13+5:30
"मी फक्त १२वी पास आहे. मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता, पण नंदिनीमुळे माझा अभ्यास बंद झाला. मी बेरोजगार आहे तर नंदिनी ब्युटी पार्लर चालवते."
इंदूर : येथे चक्क पतीच्या उदरनिर्वाहासाठी पत्नीला दरमहा पाच हजार रुपये पोटगी द्यावी लागणार आहे. कौटुंबिक न्यायालयाने हा अनोखा निर्णय दिला आहे. पत्नीमुळे शिक्षण सोडावे लागले आणि तो बेरोजगार असल्याचे कारण देत पतीने न्यायालयात दावा दाखल केला होता. डिसेंबर २०२३ मध्ये हे प्रकरण न्यायालयात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पतीच्या बाजूने निकाल दिला.
मी बेरोजगार म्हणून...
मी फक्त १२वी पास आहे. मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता, पण नंदिनीमुळे माझा अभ्यास बंद झाला. मी बेरोजगार आहे तर नंदिनी ब्युटी पार्लर चालवते. अशा परिस्थितीत मला तिच्याकडून पोटगी मिळावी, असे अमनने कोर्टात सांगितले. त्यानंतर कोर्टाने अमनचे म्हणणे मान्य करत त्याला न्यायालयीन खर्च म्हणून अतिरिक्त रक्कम देण्यासह प्रत्येक महिन्याला ५ हजार रुपये पोटगी देण्याचे निर्देश दिले.
नेमके काय घडले?
वकील मनीष जरौला यांनी सांगितले की, अमन (२३) हा उज्जैनचा रहिवासी आहे. २०२० मध्ये एका कॉमन फ्रेंडद्वारे त्याची २२ वर्षीय नंदिनीसोबत मैत्री झाली. बोलणे वाढत असताना नंदिनीने अमनला प्रपोज केले. अमनला लग्न करायचे नव्हते, पण नंदिनीने त्याला आत्महत्येची धमकी दिली.
अखेर जुलै २०२१ मध्ये दोघांनी मंदिरात लग्न केले. दोघेही भाड्याने घर घेऊन राहू लागले. लग्नानंतर नंदिनीने अमनचा छळ सुरू केला. खूप समज देऊनही तिच्या वागण्यात फरक पडला नाही. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांनी सप्टेंबरमध्ये निराश होऊन अमन नंदिनीला सोडून आई-वडिलांकडे गेला.
पत्नीचे आई-वडीलही करायचे छळ
अमनने आधी वकिलामार्फत तक्रार केली, नंतर फॅमिली कोर्टात पोटगीची केस दाखल केली. नंदिनीने अमनवर घरगुती हिंसाचाराचा गुन्हाही दाखल केला होता. मात्र, तिला अमनसोबत राहायचे आहे, असे तिने न्यायालयात सांगितले. मात्र कोर्टाने तिचा दावा फेटाळला.
दुसरीकडे अमनने कोर्टात सांगितले की, ‘नंदिनी माझा छळ करते. मला तिच्यासोबत गुदमरल्यासारखे वाटू लागले. मला असे वाटले की माझे अपहरण करून तिच्यासोबत राहण्यास भाग पाडले गेले. नंदिनीचे आई-वडीलही त्याचा छळ करायचे.