गल्लीतील सुंदर तरुणीशी पतीचं लग्न लावण्याचा पत्नीने धरला हट्ट, पोलिसांत घेतली धाव, नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 09:23 AM2024-02-22T09:23:13+5:302024-02-22T09:23:50+5:30
Extra Marital Affair: एका महिलेने तिच्या पतीचं दुसरं लग्न गल्लीतील सर्वात सुंदर तरुणीशी लावून देण्याचा हट्ट धरला. महिलेच्या नातेवाईकानी तिची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. मी माझ्या पतीवर खूप प्रेम करते असा हेका तिने लावला होता.
उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमधून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. ठाणा बाजार परिसरात राहणाऱ्या एका महिलेने तिच्या पतीचं दुसरं लग्न गल्लीतील सर्वात सुंदर तरुणीशी लावून देण्याचा हट्ट धरला. महिलेच्या नातेवाईकानी तिची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. मी माझ्या पतीवर खूप प्रेम करते असा हेका तिने लावला होता.
या महिलेने सांगितले की, काही दिवसांपासून माझे पती खूप त्रस्त झालेले होते. मी त्यांना बऱ्याचदा विचारले पण त्यांनी काही घडलेलं नाही, असं सांगत विषय टाळला. मात्र मी त्यांना मुलाची शपथ घातली तेव्हा ते रडू लागले. त्यांनी आपली समस्या सांगितली. त्यानंतर मी बऱ्याच प्रयत्नांनंतर त्यांना शांत केले. माझ्या पतीने सांगितले की, ते एका तरुणीवर प्रेम करतात. तसेच आपलं तिच्याशी लग्न लावून देण्यास सांगितले. जर आमचं लग्न झालं नाही तर मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, मी मरून जाईन असं त्यांनी मला सांगितलं.
याशिवाय या महिलेनं सांगितलं की, पतीच्या मनाला होत असलेल्या वेदना आणि त्यांना रडताना पाहून मीही रडू लागले. त्यानंतर मी त्या तरुणीच्या घरी गेले. तसेच माझ्या पतीसोबत त्या तरुणीचं लग्न लावण्याबाबत तिच्या कुटुंबीयांशी बोलले. मी त्यांना सांगितलं की, माझा पती तुमच्या मुलीवर खूप प्रेम करतो. तसेच तिच्याविना ते डिप्रेशनमध्ये जातील. तसेच ती सुद्धा त्याच्याशिवाय राहू शकत नाही.
महिलेचं हे बोलणं ऐकून या तरुणीचे नातेवाईक संतापले. त्यांनी तिला खडसावून घराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर महिलेनं थेट पोलीस ठाणं गाठलं. तसेत तिथे तिने पोलीस अधिकाऱ्यांकडे पतीचं त्या तरुणीशी लग्न करून देण्याची गळ घातली. तिने पोलिसांना सांगितले की, जर माझ्या पतीचं लग्न त्या तरुणीशी झालं नाही तर ते डिप्रेशनमध्ये जातील. ही बाब मी कुठल्याही परिस्थितीत सहन करू शकत नाही. त्यामुळे कृपया त्यांचं लग्न लावून द्या. महिलेचं हे बोलणं ऐकून पोलीस अवाक् झाले. पोलिसांनी तिची खूप समजूत काढली. मात्र ही महिला तिच्या मागणीवर अडून राहिली.
मिळत असलेल्या माहितीनुसार ही महिला काही दिवसांपूर्वीच आई झाली आहे. यादरम्यान, एक तरुणी तिच्या घरात काम करण्यासाठी येत असे. या काळात या महिलेचा पती त्या तरुणीच्या प्रेमात पडला. त्या तरुणीला तिच्या कुटुंबीयांनी परत बोलावून घेतल्यावर या महिलेचा पती निराश आणि दु:खी झाला. त्याने जेव्हा पत्नीला सारं काही सांगितलं तेव्हा तीसुद्धा अस्वस्थ झाली. त्यानंतर तिने त्या तरुणीच्या घरी जाऊन पतीसोबत दुसऱ्या लग्नासाठी तिला मागणी घातली.