माझी पत्नी पुरुष आहे; सर्वोच्च न्यायालयात पतीने केला दावा; ४२० च्या गुन्ह्यासाठी याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 08:47 AM2022-03-14T08:47:43+5:302022-03-14T08:48:18+5:30
जुलै २०१६ मध्ये एका जोडप्याचे लग्न झाले. लग्नानंतर पत्नीने पतीला शारीरिक संबंध करू दिले नाहीत.
-खुशालचंद बाहेती
नवी दिल्ली : लग्नाच्या वेळी पत्नी शारीरिकदृष्ट्या स्त्री नव्हती. तिने हे लपवून लग्न केले . त्यामुळे पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या एका पतीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नुकतीच सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने यात पत्नीला नोटीस बजावून आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.
जुलै २०१६ मध्ये एका जोडप्याचे लग्न झाले. लग्नानंतर पत्नीने पतीला शारीरिक संबंध करू दिले नाहीत. पतीने थोडे दिवस हे सहन केले. एकदा त्याने तिला न जुमानत वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पतीला धक्का बसला. तो पत्नीला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेला. तिला ‘इम्परफोरेट हायमेन’ नावाची वैद्यकीय समस्या आहे (एक वैद्यकीय स्थिती ज्यामध्ये योनीमार्गावर पडदा असतो), असे निदान झाले. या वैद्यकीय तपासणीनंतर पत्नी पतीचे घर सोडून निघून गेली. त्यानंतर पतीने हिंदू विवाह कायद्यांतर्गत पत्नी वैवाहिक संबंधास असमर्थ असल्याने विवाह रद्द घोषित करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला.
जानेवारी २०१७ मध्ये पत्नीने त्याच्याविरुद्ध कलम ४९८ अ आयपीसी अंतर्गत क्रूरतेसाठी एफआयआर दाखल केला. त्यानंतर मात्र पतीने पत्नी आणि तिच्या वडिलांविरुद्ध ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) न्यायालयात ४२० आयपीसीची (फसवणूक) तक्रार दाखल केली. शारीरिक स्थिती माहीत असूनही लग्नापूर्वी याची माहिती न देता विवाह केल्याने फसवणूक झाल्याची ही तक्रार होती. कोर्टाने पत्नी व तिच्या वडिलांविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावा असल्याचे मान्य करीत खटला सुरू केला. याविरुद्ध पत्नीचे अपील मान्य करीत हायकोर्टाने कनिष्ठ कोर्टाचा हा आदेश रद्द केला. हायकोर्टाच्या या आदेशाविरोधात पतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
पतीचा युक्तिवाद...
पुरुषसदृश अवयव आणि इम्परफोरेट हायमेनमुळे त्याची पत्नी स्त्री नाही. हे सत्य तिला लग्नापूर्वीच माहीत होते; पण तिने हे लपवून ठेवले. ही वस्तुस्थिती भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा आहे.
सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने पत्नीचा वैद्यकीय इतिहास ‘पुरुषसदृश अवयव व इम्परफोरेट हायमेन’ असल्याचे दर्शवतो याची नोंद घेत पत्नीला नोटीस बजावली.