जय-पराजय हा राजकारणाचा भाग, आकड्यांचा खेळ सुरूच राहिल; मोदींचे मंत्रिपरिषदेमध्ये 'संकेत'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 04:57 PM2024-06-05T16:57:42+5:302024-06-05T16:58:15+5:30
Narendra Modi cabinet meeting Speech before resignation: नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपविला आहे. यापूर्वी मोदी यांनी शेवटच्या मंत्रिपरिषदेला संबोधित केले.
नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपविला आहे. यापूर्वी मोदी यांनी शेवटच्या मंत्रिपरिषदेला संबोधित केले. यावेळी मोदी यांनी लोकसभेच्या निकालावर भाष्य केले. भाजपला बहुमत मिळाले नाही परंतु एनडीएला बहुमत मिळाले यामुळे मंत्रिमंडळात काहीसे नाराजीचे वातावरण होते. यावर मोदींनी जय-पराजय हा राजकारणाचा भाग आहे, आकड्यांचा खेळ सुरूच राहतो, असे म्हटले आहे.
आम्ही दहा वर्षे चांगले काम केले आहे आणि भविष्यातही करू, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. सत्ताधारी आघाडी जनतेच्या सर्व अपेक्षांवर खरी उतरली आहे. तुम्ही सर्वांनी चांगले काम केले आहे, खूप मेहनत केली आहे, असे म्हणत मोदींनी सहकाऱ्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला.
सकाळी 11.30 वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक सुरू झाली. मोदी 2.0 कॅबिनेट आणि मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक होती. आता चार वाजता पुन्हा एनडीएच्या नेत्यांची बैठक सुरु झाली आहे. यामध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली आणि पुढील रणनिती ठरणार आहे. नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू या बैठकीला हजर आहेत. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या बैठकीला गेले आहेत. अजित पवारांनी या बैठकीला जाणे टाळले आहे.
दरम्यान, दिल्लीमध्ये सत्तास्थापनेसाठी हालचाली होत असतानाच नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळही निश्चित करण्यात आली आहे. ८ जून रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच नरेंद्र मोदींच्या नावावर एक नवा विक्रम होणार आहे. सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून देशाचे पंतप्रधान होणारे ते देशातील दुसरे नेते बनतील.
लोकसभेच्या निकालानुसार एनडीएला २९२ जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच एनडीए सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या २७२ या बहुमतापार आहे. भाजपाकडे 240 तर टीडीपीकडे 16 जागा आहेत. जदयूकडे १२ खासदार आहेत. एकनाथ शिंदेंची शिवसेना ७, पासवान यांचे ५, जेडीएस २ असे खासदार पकडता भाजपा या काही पक्षांच्या मदतीनेच २७२ चा आकडा सहज पार करू शकते. एनडीएकडे सध्या २० जागा जास्तीच्या आहेत.