‘सुपर ओव्हर’ने होणार विजेत्याचा फैसला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 05:26 AM2022-05-24T05:26:08+5:302022-05-24T05:27:02+5:30
प्ले ऑफ, फायनलसाठी नवे निर्देश
नवी दिल्ली : पावसामुळे व्यत्यय आल्यास आणि नियमित वेळेत खेळ होऊ न शकल्यास आयपीएल १५च्या विजेत्याचा फैसला सुपरओव्हरद्वारे होईल.
आयपीएल कौन्सिलने सोमवारी जाहीर केलेल्या निर्देशानुसार एकही षटक टाकले गेले नाही तर लीगच्या सुरुवातीच्या टप्प्यातील गुणतालिकेचा आधार घेतला जाईल. याच आधारे विजेत्याचा निर्णय होईल. हे निर्देश क्वालिफायर १, एलिमिनेटर आणि क्वालिफायर दोनसाठीही लागू राहतील. या सामन्यांसाठी कुठलाही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. २९ मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात व्यत्यय आल्यास ३० मे हा राखीव दिवस असेल. अंतिम सामना रात्री ८ वाजेपासून खेळला जाईल.
आयपीएल प्ले ऑफमधील दोन सामने कोलकाता येथील ईडन गार्डनवर होणार आहेत. येथे सामन्यादरम्यान खराब हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पावसामुळे व्यत्यय येण्याची शंका लक्षात घेत आयपीएलने दिशानिर्देश जाहीर केले. मंगळवारी (दि. २४) पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातची लढत राजस्थानविरुद्ध होईल. बुधवारी याच ठिकाणी एलिमिनेटरमध्ये लखनौविरुद्ध आरसीबी ही लढत रंगणार आहे. दुसरा क्वालिफायर अहमदाबादमध्ये शुक्रवारी होईल. याच ठिकाणी रविवारी आयपीएलची अंतिम लढत रंगणार आहे. आयपीएल निर्देशानुसार, ‘प्ले ऑफमध्ये गरजेनुसार सामन्यातील षटकांची संख्या किमान पाच षटकांपर्यंत कमी केली जाईल.