संसदेचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर?; डिसेंबरच्या मध्यात सुरू होऊन जानेवारीपर्यंत चालण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 12:04 PM2022-11-04T12:04:46+5:302022-11-04T12:04:53+5:30
संसदेच्या नव्या इमारतीत संपूर्ण हिवाळी अधिवेशन घेणे शक्य दिसत नाही.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : यावर्षी संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता नसून, लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अधिवेशन डिसेंबरच्या मध्यात सुरू होऊन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ते चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संसद अधिवेशन लांबणीवर पडण्यामागे दोन कारणे दिसतात. पहिले म्हणजे गुजरातमधील महत्त्वपूर्ण विधानसभा निवडणूक आणि दुसरे म्हणजे नव्यानेच उभारण्यात आलेल्या इमारतीत लोकसभा-राज्यसभेच्या सदस्यांचे संयुक्त संबोधन घेण्याबाबतच्या पंतप्रधानांच्या आग्रहामुळे.
संसदेच्या नव्या इमारतीत संपूर्ण हिवाळी अधिवेशन घेणे शक्य दिसत नाही. स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त नव्या इमारतीत हिवाळी अधिवेशन घेण्याबाबत पंतप्रधान आग्रही आहेत. यावर व्यवहार्य तोडगा म्हणून संयुक्त बैठक नव्या इमारतीत घ्यायची व नियमित सत्र जुन्या इमारतीच्या दोन्ही सभागृहांत घ्यायचे, असे ठरविण्यात आले आहे. अधिवेशन नोव्हेंबरनंतर घेण्यात येत असल्याबद्दल काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आवाज उठवला असला तरी यापूर्वीही असे झालेले आहे, असा दाखला देण्यात येत आहे.
सरकार काय घेतेय काळजी?
संसदीय व्यवहार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, २०१७ मध्येही हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबर रोजी सुरू झाले होते व ५ जानेवारीपर्यंत चालले होते. विधानसभा निवडणुका आणि संसद अधिवेशनाच्या तारखा एकाचवेळी येऊ नयेत, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. संसदेच्या अधिवेशनात सरकारकडून महत्त्वाचे धोरणात्मक विषय हाताळले जात असल्यामुळे ही काळजी घेतली जात आहे.