ह्रदयद्रावक... दोन चिमुकल्यांना लटकवून महिलेने घेतला गळफास ?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 06:22 AM2024-02-04T06:22:08+5:302024-02-04T06:22:31+5:30
घटना घडली तेव्हा घरात कुणीही उपस्थित नसल्याचे समजते.
बालोद (छत्तीसगड) : दुपारच्या जेवणासाठी घरी आलेल्या पतीला राहत्या घरात पत्नीने दोन लहान मुलांसह गळफास घेतल्याचे आढळून आल्याने बालोद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. पतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
येथील कोचेरा गावात ही घटना शुक्रवारी घडली आहे. या घरात सायंकाळी तीन मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. दोन वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा यांचे मृतदेह एकाच दोरीला लटकले होते तर हेमलता साहू (वय २८) यांचा मृतदेह दुसऱ्या दोरीला लटकलेला आढळला. घटना घडली तेव्हा घरात कुणीही उपस्थित नसल्याचे समजते.
आसपासच्या नागरिकांनी सांगितले की, हेमलताचा पती तुमेश्वर साहू कामानिमित्त बाहेर गेला होता. दुपारी परतला असता त्याला घराचे दोन्ही दरवाजे बंद असल्याचे आढळले. तासाभरानंतर भिंतीवरून उडी मारून त्याने प्रवेश केला असता त्याला घरात तिघांचे मृतदेह आढळले. मग त्यानेच ही माहिती पोलिसांना दिली. ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. आत्महत्या असेल तर महिलेने असे कृत्य का केले असावे, यामागचे कारणही तपासानंतरच स्पष्ट होऊ शकेल. ही हत्या आहे का, याबाबतही पोलिस तपास करणार आहेत.