महिला म्हणाली, ‘त्याला’ मत देणार; उमेदवाराने लगावली कानशिलात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 07:56 AM2024-05-05T07:56:35+5:302024-05-05T07:56:43+5:30
तेलंगणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; टीकेचा भडिमार
निझामाबाद (तेलंगणा) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा निझामाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार टी. जीवन रेड्डी यांनी प्रचारादरम्यान एक वृद्ध महिलेला कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आरमूर विभागात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी टी. जीवन रेड्डी यांच्यापुढे एक महिला आली. माझ्याकडे ना घर आहे, ना मला कुठलीही पेन्शन मिळते. तिने त्यांना (टी. जीवन रेड्डी) दया करण्याची विनंती केली. तुम्हाला सर्वकाही मिळेल, असे म्हटल्यावर रेड्डी यांनी तुम्ही कुणाला मतदान करणार आहात, असा प्रश्न विचारला. त्यावर महिलेने माझी फुलाला मत देण्याची इच्छा असल्याचे म्हटले. महिलेचे उत्तर ऐकून रागावलेल्या रेड्डी यांनी महिलेला थप्पड लगावली. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत मी वृद्धेला थप्पड लगावली नाही. प्रेमाने तिच्या गालाला हात लावला. - टी. जीवन रेड्डी, कॉंग्रेस उमेदवार
इंडिया आघाडी सत्तेत आल्यास टी. जीवन रेड्डी हे केंद्रीय कृषिमंत्री होतील, असे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी म्हणतात. पण टी. जीवन रेड्डी यांचे वृद्ध महिलांबाबतचे वर्तन निंदनीय आहे.
- विष्णू वर्धन रेड्डी,
भाजप नेते