जग संकटात आहे, वृद्धीचा सूर्य दक्षिणेकडूनच उगवेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 07:48 AM2023-01-13T07:48:43+5:302023-01-13T07:48:51+5:30
‘व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ’ परिषदेला डिजिटल पद्धतीने संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते.
नवी दिल्ली : जग सध्या संकटात आहे व ही अस्थिरता किती काळ टिकेल हे सांगणे कठीण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. ग्लोबल साऊथ अर्थात दक्षिणेकडील देशांनी त्यांना अनुकूल नसलेल्या प्रणाली व परिस्थितीवरील अवलंबित्वाच्या चक्रातून बाहेर पडण्याच्या गरजेवर भर देताना २१ व्या शतकातील जागतिक वाढ दक्षिणेकडील देशांतूनच येईल, असेही ते म्हणाले.
‘व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ’ परिषदेला डिजिटल पद्धतीने संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. त्यांनी अन्न, इंधन आणि खतांच्या वाढत्या किमती, कोरानाचा आर्थिक परिणाम तसेच हवामान बदलामुळे उद्भवलेल्या आपत्तींबद्दल चिंता व्यक्त केली. मोदी म्हणाले, समाज आणि अर्थव्यवस्था बदलू शकणारे साधे आणि शाश्वत उपाय शोधणे ही काळाची गरज आहे.’’
आज यापैकी बहुतेक प्रगत अर्थव्यवस्था मंदावत आहेत. स्पष्टपणे, २१ व्या शतकातील जागतिक वाढ दक्षिणेकडील देशांकडून होईल. मला वाटते की, जर आपण एकत्र काम केले तर आपण जागतिक अजेंडा निश्चित करू शकतो.
- नरेंद्र मोदी