कुरुक्षेत्रात स्थापित होणार जगातील सर्वांत मोठी गीता, वजन १००० किलो
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 08:01 AM2023-05-03T08:01:06+5:302023-05-03T08:01:12+5:30
मिलानमध्ये तयार होत आहे पवित्र ग्रंथ; ७०० पाने यंत्राद्वारे उलटावी लागणार
चंडीगड - हरयाणातील कुरुक्षेत्र या ऐतिहासिक शहराच्या ज्योतीसरमध्ये जगातील सर्वांत मोठी गीता स्थापन करण्यात येणार असून, या ग्रंथाचे वजन १००० किलो असेल. इटलीच्या मिलानमध्ये हा ग्रंथ यूपो सिंथेटिक पेपरपासून तयार करण्यात येणार आहे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या जगातील पहिल्या रथासारख्या मंदिरात हा ग्रंथ ठेवण्यात येणार आहे. या ग्रंथाची सुमारे ७०० पाने यंत्राद्वारेच उलटावी लागणार आहेत. श्रीकृष्ण-अर्जुन यांची एकाचवेळी पूजा होणारे हे पहिलेच मंदिर असेल.
या मंदिराचे बांधकाम इस्कॉनकडून केले जात आहे. भगवान श्रीकृष्णांनी ५,१६० वर्षांपूर्वी ज्याठिकाणी कर्मयोगाचा अमर संदेश दिला होता, त्याठिकाणी होत असलेल्या श्रीकृष्ण-अर्जुन मंदिरात गीता ठेवली जाईल. या मंदिरात अत्याधुनिक गीता संग्रहालयही उभारले जात आहे. श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचा संदेश कसा दिला, हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येथे दाखवण्यात येणार आहे. मंदिरात एकाच वेळी ६०० भाविकांना कीर्तन करता येणार आहे. मंदिराचे बांधकाम यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
रथासारख्या मंदिरासाठी मुंबईत तयार केले घोडे
मंदिराचे व्यवस्थापक साक्षी गोपाल दास यांनी सांगितले की, या रथासारख्या मंदिरासाठी ४० फूट लांब आणि ३० फूट उंचीचे घोडे मुंबईत तयार करण्यात आले आहेत. महाभारताच्या युद्धात श्रीकृष्ण रथारूढ होऊन अर्जुनाला गीतेचा संदेश देत होते, त्याच दृश्यांचे मंदिरात चित्रण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पवित्र गीता आणि या मंदिराचे उद्घाटन डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे यासाठीही प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.