"जगाने अत्यंत द्रष्टा नेता अन् मी एक प्रिय मित्र गमावला" 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 08:42 AM2022-07-09T08:42:56+5:302022-07-09T08:43:31+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावना खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी...

The worlds most visionary leader and I lost a dear friend pm narendra modi on japan shinzo abe death | "जगाने अत्यंत द्रष्टा नेता अन् मी एक प्रिय मित्र गमावला" 

"जगाने अत्यंत द्रष्टा नेता अन् मी एक प्रिय मित्र गमावला" 

Next

माझे घनिष्ठ मित्र शिंजो आबे...
मी गुजरातचा मुख्यमंत्री असतांना २००७ मध्ये पहिल्यांदा शिंजो आबे यांना भेटलो. त्यांच्या माझ्या पहिल्या भेटीपासूनच आमची मैत्री कार्यालयीन सोपस्कार आणि शिष्टाचारांचे अडथळे पार करुन त्याच्या पलीकडे गेली होती. क्योटोच्या तोजी मंदिरात आमची झालेली भेट, शिंकानसेन (रेल्वे) मधून आमचा एकत्रित प्रवास, अहमदाबादला साबरमती आश्रमात आम्ही एकत्रित दिलेली भेट, काशीमध्ये दोघांनी मिळून केलेली गंगा आरती, टोक्योमधला भव्य चहा समारंभ. आमच्या दोघांच्या भेटीतल्या अशा असंख्य अविस्मरणीय क्षणांची यादी खरेच खूप मोठी आहे.

माऊंट फूजीच्या पायथ्याशी असलेल्या यामानाशी प्रांतातल्या त्यांच्या मूळगावी मला आमंत्रित करुन, त्यांनी मला जो सन्मान दिला दिला होता, त्याच्या स्मृती माझ्या मनात चिरकाल राहणार आहेत. २००७ ते २०१२ या काळात ते जपानचे पंतप्रधान नसतांनाही आणि अगदी अलीकडे २०२० नंतर सुद्धा माझे त्यांच्याशी असलेले स्नेहाचे घट्ट संबंध कायम दृढ राहिले. त्यांनी आपल्याला दिलेल्या सर्वात मोठ्या भेटवस्तू आणि त्यांचा सर्वात चिरस्थायी ठेवा ज्यासाठी जग कायम ऋणी राहील अशी गोष्ट म्हणजे बदलते वारे आणि संकट ओळखण्याची दूरदृष्टी आणि त्याला सामोरे जाण्यासाठी आवश्यक नेतृत्व त्यांच्याकडे होते. इतरांच्या खूप आधी, त्यांनी २००७ मध्ये भारतीय संसदेतील आपल्या मुख्य भाषणात समकालीन राजकीय, सामरिक आणि आर्थिक वास्तवाचा उल्लेख करताना या शतकात जगाला आकार देईल अशा हिंद-प्रशांत क्षेत्राच्या उदयाचा पाया रचला.

सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेप्रती आदर, आंतरराष्ट्रीय कायदा आणि नियमांचे पालन, दृढ आर्थिक सहभागातून समानतेच्या भावनेने आणि सामायिक समृद्धीसाठी शांततेने आंतरराष्ट्रीय संबंध जपणे या मूल्यांवर आधारित, स्थिर आणि सुरक्षित, शांततापूर्ण आणि समृद्ध भविष्यासाठी एक रूपरेषा आणि व्यवस्था उभारण्यात ते आघाडीवर होते. क्वाड, आसियान नेतृत्वातील मंच, हिंद-प्रशांत  महासागर उपक्रम, आशिया-आफ्रिका विकास कॉरिडॉर आणि आपत्ती रोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडीला त्यांच्या योगदानाचा मोठा फायदा झाला. शांतपणे आणि गाजावाजा न करता देशांतर्गत संभ्रम आणि परदेशातून व्यक्त केला जात असलेल्या संशयावर मात करून, त्यांनी संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात संरक्षण, कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासाबरोबरच जपानच्या धोरणात्मक सहभागामध्ये परिवर्तन घडवून आणले. त्यासाठी हा प्रदेश नियतीबद्दल अधिक आशावादी ठरला आणि जगाला भविष्याबद्दल अधिक विश्वास वाटत आहे.

या वर्षी मे महिन्यात जपान भेटीदरम्यान आबे यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी नुकतेच जपान-भारत संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले होते. ते नेहमीप्रमाणे उत्साही, मनमोकळे, करिष्मा असलेले आणि अतिशय विनोदी होते. भारत-जपान मैत्री आणखी दृढ कशी करता येईल याविषयी त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना होत्या. त्या दिवशी मी त्यांचा निरोप घेतला तेव्हा ही आमची शेवटची भेट असेल याची मला कल्पनाही नव्हती. त्यांचा प्रेमळपणा आणि बुद्धिमत्ता, त्यांनी दाखवलेली कृपादृष्टी आणि औदार्य, मैत्री आणि मार्गदर्शन यासाठी मी त्यांचा नेहमीच ऋणी राहीन आणि मला त्यांची खूप आठवण येईल. त्यांनी आम्हाला मोकळ्या मनाने स्वीकारले, हे स्मरणात ठेवून भारतात आम्ही त्यांच्या निधनाबद्दल दुखवटा पाळला आहे. लोकांना प्रेरणा देणे हे त्यांना सर्वात जास्त आवडायचे आणि तेच करत असताना त्यांना मृत्यूने गाठले. त्यांचे आयुष्य दुर्दैवीरित्या हिरावून घेतले असले तरी त्यांचा वारसा पुढे कायम राहील. मी भारतातील लोकांच्यावतीने आणि माझ्या स्वत:च्या वतीने जपानच्या लोकांच्या, विशेषत: आकी आबे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मनापासून सहभागी आहे. ओम शांती.

काळाच्या पुढे राहण्याची दूरदृष्टी... 
भारत-जपान संबंधांमधील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन २०२१ मध्ये त्यांना प्रतिष्ठेचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जगातील विविध जटिल स्थित्यंतरांची आबे यांना अचूक माहिती होती. काळाच्या पुढे राहण्याची त्यांची दूरदृष्टी होती. परिषदांच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट आणि धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आणि देशातील जनतेला, जगाला बरोबर घेऊन जाण्याची दुर्मिळ क्षमता त्यांच्याकडे होती.

नवनवीन, अभिनव कल्पनांचा साठा
आबे यांच्यासोबतची माझी प्रत्येक भेट वैचारिकदृष्ट्या मला अधिकाधिक समृद्ध करणारी होती. त्यांच्याकडे कायमच नवनवीन, अभिनव कल्पनांचा साठा असे. 

गुजरातसाठी मी आखलेल्या आर्थिक धोरणात, त्यांनी दिलेले सल्ले फार प्रेरक होते. भारत आणि जपान यांच्यातील राजनैतिक भागीदारीत परिवर्तन घडवण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. 

दोन्ही देशांमध्ये असलेल्या, अत्यंत मर्यादित अशा द्वीपक्षीय संबंधांना आबे यांनी व्यापक आणि सर्वसमावेशक आयाम दिले. भारतासोबत नागरी आण्विक कराराचा पाठपुरावा करण्याचा त्यांचा दृढनिश्चय होता, जो त्यांच्या देशासाठी अत्यंत कठीण होता आणि भारतातील हाय स्पीड रेल्वेसाठी अत्यंत उदार अटीशर्ती निश्चित करण्यात त्यांची भूमिका निर्णायक ठरली होती. 

Web Title: The worlds most visionary leader and I lost a dear friend pm narendra modi on japan shinzo abe death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.