राम मंदिराचा फोटो एडिट करून लावले पाकिस्तानचे झेंडे; तरुणाला पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 07:12 PM2024-01-22T19:12:48+5:302024-01-22T19:16:23+5:30
या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि त्यानंतर एका युवकाला ताब्यात घेतलं.
Ram Mandir Ayodhya ( Marathi News ) : अयोध्येत रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. केवळ हिंदूच नव्हे, तर देशातील सर्वधर्मीय नागरिकांनी या सोहळ्याच्या आनंदात सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र कर्नाटक येथील गडग जिल्ह्यात मात्र एका माथेफिरू तरुणाने राम मंदिराबाबत वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट व्हायरल होताच हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली.
फेसबुकवर राम मंदिराबाबत वादग्रस्त पोस्ट व्हायरल होताच या पोस्टबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, एक तरुणाने राम मंदिराचा फोटो एडिट करून त्यावर पाकिस्तानचे झेंडे लावले आहेत. तसंच फोटोवर बाबरी मशीद असंही लिहिलं आहे.
या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि त्यानंतर एका युवकाला ताब्यात घेतलं. तसंच वादग्रस्त पोस्ट फेसबुकवरून डिलिट करण्यात आली आहे. आरोपीचं नाव ताजुद्दीन असं असून तो गडग परिसरातील रहिवासी आहे.
उत्तर प्रदेशात हिंदू-मुस्लीम एकतेचं दर्शन
कर्नाटकात एका तरुणाच्या पोस्टने तणाव निर्माण झालेला असताना उत्तर प्रदेशात मात्र हिंदू-मुस्लीम एकतेचं दर्शन घडलं. राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम समाजातील काही नागरिकांनी लाडू वाटून आनंद साजरा केला.