सीमाभागातील आंदोलकाच्या वाहनाची कोल्हापुरात चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 02:27 PM2022-12-29T14:27:14+5:302022-12-29T14:28:33+5:30
सीमाभागातील तरुणांच्या वाहनाची आंदोलन स्थळावरून चोरी झाल्याने आंदोलनातील कार्यकर्त्यावर संकट ओढवले आहे.
बेळगाव : सीमाप्रश्नी महाराष्ट्राचे लक्ष वेधून येथील सीमावासियांच्या भावना महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने नुकतीच 'चलो कोल्हापूर'ची हाक दिली. या अंतर्गत बेळगावमधील हजारो मराठी भाषिक कोल्हापूरला रवाना झाले. २६ डिसेंबर रोजी झालेल्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेल्या सीमाभागातील तरुणांच्या वाहनाची आंदोलन स्थळावरून चोरी झाल्याने आंदोलनातील कार्यकर्त्यावर संकट ओढवले आहे.
कर्नाटकातील सरकार तरुणांवर कमी अत्याचार करते की काय म्हणून महाराष्ट्रात तरुणावर हे संकट ओढवावे ही चिंतेची बाब ठरली आहे. सीमाभागातील मराठी तरुणांवर येथील प्रशासन जाणीवपूर्वक अत्याचार करतेच. या ना त्या कारणास्तव चुकीच्या तक्रारी दाखल करून खोट्या केसेस घालण्यात येतात. या प्रकाराला कंटाळूनच तरुणांनी कर्नाटकी पाशातून सोडविण्यासाठी महाराष्ट्र दरबारी आपली केविलवाणी परिस्थिती मांडण्यासाठी आंदोलन केले. आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लक्ष वेधण्यासाठी बेळगाव ते कोल्हापूर दौरा निश्चित केला. मात्र आंदोलनस्थळावरून गायब झालेल्या दुचाकीमुळे या मराठी तरुणांना अधिकच त्रास सोसावा लागला आहे.
अलीकडे अनेक ठिकाणी चोरीच्या घटनांचे सत्र वाढले आहे. मात्र भरदिवसा झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे कोल्हापूर शाहूपुरी स्थानकाच्या पोलिसांनी चोरीच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न करणे, शिवाय या कार्यकर्त्याची दुचाकी लवकरात लवकर शोधून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.