स्पाईसजेट विमानातून प्रवाशांच्या सामानाची चोरी, प्रवक्त्यांनी दिलं स्पष्टीकरण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 01:18 PM2021-03-16T13:18:53+5:302021-03-16T13:19:36+5:30
दिल्ली विमानतळावर प्रवाशी आपल्या बॅगा आणि सामान घेण्यासाठी जमले होते. त्यावेळी, बनविण्यात आलेल्या व्हिडिओतील प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक पाहून ही घटना समोर आली.
नवी दिल्ली - खासगी विमानसेवा पुरविणाऱ्या स्पाईस जेट विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सामानाचे कुलूप तुटल्याचे आणि त्यांच्या सामानातून मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 11 मार्च रोजी दुबई ते दिल्ली प्रवास करणाऱ्या एसजी 178 स्पाईसजेट विमानातील प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागला असून त्यांच्या सामानाची चोरी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचं स्पाईसजेटने सांगितलंय. तसेच, अद्यापही एकही चोरीची तक्रार नोंद नसल्याचंही स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.
दिल्ली विमानतळावर प्रवाशी आपल्या बॅगा आणि सामान घेण्यासाठी जमले होते. त्यावेळी, बनविण्यात आलेल्या व्हिडिओतील प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक पाहून ही घटना समोर आली. सध्या, सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या अनेकांनी आपले सामान चोरी गेल्याची तक्रार नोंदवली आहे.
सोशल मीडियातील व्हिडिओमुळे ही घटना सर्वत्र झाली असून स्पाईसजेटच्या व्यवस्थापकीय विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. मात्र, या विमानातून दुबई ते दिल्ली प्रवास करणाऱ्या एकाही प्रवाशाने अद्याप आमच्याकडे सामानाची चोरी झाल्याची तक्रार दिली नाही हेही आम्हाला स्पष्ट करायचे आहे. तसेच, सोशल मीडियावर बनावट व्हिडिओच्या माध्यमातून स्पाईसजेटची प्रतिमा मलिन करणाऱ्यांविरुद्ध आम्ही कायदेशीर मार्गाने कारवाई करणार असल्याचा इशाराही स्पाईसजेटच्या प्रवक्त्यांनी दिलाय.
प्रवाशांना नेहमीच सूचना देण्यात येतात. त्यामध्ये, मौल्यवान वस्तू लगेजमध्ये न ठेवता, एका हँड बॅगमध्ये ठेवाव्यात असे सांगितले जाते. हँड बॅग स्वत:सोबत बाळगून आपले मौल्यवान सामान सुरक्षित ठेवण्याचा सल्लाही दिला जातो. मात्र, याचा अर्थ असा नाही की, या घटनेचा तपास होणार नाही. या घटनेचा तपास केला जाईल. मात्र, चोरी गेलेले सामान मिळण्याची शक्यता फार कमी असते, असेही संबंधित विभागातील वरिष्ठांनी सांगितलं आहे. नुकतेच, स्पाईसजेट विमानातून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांसोबत मौल्यवान वस्तू गहाळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याचेही या प्रवक्त्यांनी सांगितलं.