...तर कोचिंग क्लासेसवर कारवाई
By admin | Published: February 28, 2016 01:30 AM2016-02-28T01:30:35+5:302016-02-28T01:30:35+5:30
विद्यार्थ्यांना मोठ्या व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळणाऱ्या कोचिंग क्लासेसविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यासह
- प्रमोद गवळी, नवी दिल्ली
विद्यार्थ्यांना मोठ्या व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळणाऱ्या कोचिंग क्लासेसविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यासह अन्य सर्व कायद्याखाली कारवाई करणे शक्य आहे; मात्र त्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी तक्रारी करणे गरजेचे आहे.
राज्यसभेत विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाला मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी वरील उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, देशातील कोचिंग क्लासेस अनुभवी शिक्षकांना प्रचंड पगाराचे आमिष दाखवत असल्याबाबतचे अधिकृत आकडे सरकारकडे उपलब्ध नाहीत.
सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अनुभवी शिक्षक असावेत, यासाठी न घेतलेल्या रजेचा पगार देणे, ग्रॅच्युइटी, पेन्शन यासह सर्व सुविधा देणे सरकार करीत आहे. शिवाय त्यांना आकर्षक वेतन दिले जाते आणि पदोन्नतीबरोबरच चांगल्या प्रशिक्षण योजनतेही त्यांना सहभागी करून घेतले जाते.
पशुपतीनाथ मंदिरासाठी भारताकडून चंदन
खासदार विजय दर्डा यांनी उपस्थित केलेल्या अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळच्या दौऱ्यावर गेले असताना, काठमांडूतील प्रख्यात पशुपतीनाथ मंदिरासाठी दोन कोटी रुपये किमतीचे चंदनाचे लाकूड देण्यात आले होते; मात्र हे चंदन जप्त केलेले तसेच सुके होते आणि त्यासाठी चंदनाची झाडे तोडण्यात आली नव्हती.
सिंग म्हणाले, पशुपतीनाथ क्षेत्र विकास ट्रस्टला २५00 किलो चंदन भेट म्हणून देण्यात आले. ते पाठवण्याचा खर्च, त्याची पॅकिंग यावर १ कोटी ९१ लाख रुपये खर्च आला. तामिळनाडूतील जंगलातून हे चंदन आणण्यात आले होते. त्यासाठी चंदनाची झाडे तोडली न गेल्यामुळे त्या बदल्यात नवी झाडे लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
चंदनाच्या लाकडांच्या निर्यातीवर बंदी आहे; मात्र वाणिज्य विभागाने तामिळनाडू सरकारची या चंदनाच्या निर्यातीसाठी परवानगी घेतली होती, असेही त्यांनी उत्तरात स्पष्ट केले.