... तर मग चिनी अॅपप्रमाणेच 'नमो अॅप'वरही बंदी घाला; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 01:37 PM2020-06-30T13:37:20+5:302020-06-30T15:52:36+5:30
देशात बॅन केलेल्या 59 चीनी अॅप्समुळे खासगी डेटा व खासगीपण यांच्यावर आक्रमण होत असल्याच्या तक्रारी आहेत.
मुंबई - केंद्र सरकारने भारताच्या सुरक्षिततेला धोका ठरू शकणाऱ्या 59 चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. बाजारात कोट्यवधींच्या संख्येने विकल्या जाणाऱ्या चिनी कंपन्यांच्या मोबाईल फोनमध्ये यापैकी बरीच लोकप्रिय अॅप इनबिल्ट पद्धतीने उपलब्ध असल्याने सरकारने या अॅप्सचा वापर करण्यासही बंदी घातली आहे. त्यानंतर, काँग्रेसने भाजपाला टार्गेट केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारकडे आणखी एका अॅपवरबंदी घालण्याची मागणी केली आहे.
देशात बॅन केलेल्या 59 चीनी अॅप्समुळे खासगी डेटा व खासगीपण यांच्यावर आक्रमण होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने या चीनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाने निवडणूक प्रचार कॅम्पेनमध्ये लाँच केलेल्या नमो अॅपवरही बंदी घालण्याची मागणी केली आहे. ''देशातील 130 कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात आहे, म्हणून सरकारने ५९ मोबाईल अॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खासगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे NaMo अॅपदेखील बंद केले पाहिजे,'' असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपाला लक्ष्य करत, एकप्रकारे 59 चीनी अॅपवरील बंदीच्या निर्णयावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
१३० कोटी भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने ५९ मोबाईल अॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे NaMo अॅप देखील बंद केले पाहिजे. #BanNaMoApp
— Prithviraj Chavan (@prithvrj) June 30, 2020
दरम्यान, यापूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे सुरु करण्यात आलेल्या नमो अॅपवरील डेटाच्या कथित गैरवापराबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. त्यानंतर केलेल्या तपासणीत या अॅपच्या माध्यमातून वापरकर्त्यांनी दिलेल्या 22 मुद्द्यांची माहिती थर्ड पार्टीला पुरवली जात असल्याचे समोर आले आहे. यामध्ये वापरकर्त्याचे लोकेशन, छायाचित्रे , कॉन्टॅक्स, मायक्रोफोन आणि कॅमेरा अशा गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय, पीएमओ इंडिया या अॅपच्या वापरकर्त्यांनी दिलेल्या 14 मुद्द्यांची माहिती परस्पर इतरांना पुरवली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर माहिती व तंत्रज्ञान विभागाचे 'सिटीझन एंगेजमेंट अॅपप' आणि 'माय गव्हर्नमेंट अॅपप' या दोन्हींच्या माध्यमातून वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीचे साधारण 9 तपशील थर्ड पार्टीपर्यंत पोहोचत असल्याचेही समोर आले.
'नमो अॅपप'च्या माध्यमातून वापरकर्त्यांना भाजपा सरकारच्या कामगिरीबद्दल माहिती दिली जाते. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा ऑडिओ उपलब्ध करून दिला जातो. मात्र, @fs0c131y या ट्विटर हँडलच्या माध्यमातून नमो अॅपपच्या कार्यपद्धतीविषयी काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. 'दि इंडियन एक्स्प्रेस'ने अधिक चौकशी केली असता हे ट्विटर अकाऊंट रॉबर्ट बाप्टिस्ट या फ्रेंच सुरक्षा तज्ज्ञाचे आहे. रॉबर्ट बाप्टिस्ट यांच्या म्हणण्यानुसार नमो अॅपपवरील डेटा अमेरिकास्थित क्लेव्हर टॅप या कंपनीला पुरवला जातो.