"... तर भाजपाने संपूर्ण दिल्ली बंद केली असती"; संजय राऊतांनी सांगितलं राज'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 11:25 AM2023-12-18T11:25:23+5:302023-12-18T11:26:19+5:30
खासदार संजय राऊत यांनीही गृहमंत्र्यांनी अद्याप स्पष्टीकरण न दिल्याने भाजपावर टीका केली आहे.
नवी दिल्ली - दिल्लीतील नव्या संसदेत १३ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा घुसकोरीची घटना घडली. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी चक्क खासदारांच्या बाकांवर उड्या घेतल्या आणि घोषणाबाजी केली. त्यानंतर स्मोक क्रॅकर फोडून धूर केला. या घटनेत देशाची सर्वोच्च इमारत असलेल्या संसदेची सुरक्षा भेदली गेली आणि संपूर्ण देश हादरला. या घटनेनंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. तर, देशाच्या संसद भवनातील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आज संसदेत याप्रकरणावरुन गदारोळ होत असून खासदार संजय राऊत यांनीही गृहमंत्र्यांनी अद्याप स्पष्टीकरण न दिल्याने भाजपावर टीका केली आहे.
शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी संसदेतील घटनेवर भाष्य् करताना यापूर्वी देशाच्या सीमारेषेवरील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता. तर, आता गृहमंत्र्यांनी अद्याप का स्पष्टीकरण दिलं नाही, असे त्यांनी म्हटलं आहे. लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या चार जणांसह यामागील मास्टरमाईंडलाही पकडले गेले असून या घटनेची आता चौकशी केली जात आहे. याप्रकरणी, आरोपींवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे.
संसदेतील घुसखोरीवर गृहमंत्री अमित शहा यांनी अद्याप भाष्य केलं नाही. त्यामुळे, विरोधक आक्रमक झाले आहेत. खा. संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. ''संसदेतील घुसखोरीच्या प्रकरणावेळी आजमित्तीस दिल्लीत जर इतर कोणाचं सरकार असते, तर भाजपावाल्यांनी दिल्ली बंद केली असती. पण, तुमच्या खासदाराने लोकांना संसदेत घुसण्याची संधी दिली, त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी दिल्लीतील संसद भवनाच्या सुरक्षेत झालेल्या निष्काळजीपणावर भाष्य केलं. तसेच, याप्रकरणी राजकारण होता कामा नये, कारण हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. मात्र, याबाबत अद्याप गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण किंवा विधानही आलं नाही. पण, त्यांनी ससंदेत यायला हवं, घटनेवर भाष्य तरी करायला हवं. यात घाबरण्याचे काहीच कारण नाही. जे घडलंय ते घडलंय, पुढे होणार नाही, हे तरी सांगावं,'' असे म्हणत संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांवर आणि भाजपावर निशाणा साधला.
#WATCH | On Parliament security breach incident, Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says,"If there was any other party in power at the Centre, then BJP would have shut down the entire Delhi on this issue. No action was taken against the BJP MP who gave these people (accused in… pic.twitter.com/7cTJ6qTvpF
— ANI (@ANI) December 18, 2023
यापूर्वी सीमारेषेवरील सुरक्षेवरही उपस्थित केले प्रश्न
देशाच्या संसदेतील सुरक्षेत अशाप्रकारे गोंधळ उडत असेल, तर देशाची सुरक्षा आणि सीमारेषेवरील स्थिती आपण समजू शकतो. लडाखने चीनच्या सैन्याने कशारितीने घुसकोरी केली, काश्मीरमध्ये पाकिस्तानी घुसकोर कशारितीने घुसकोरी करत असतील हे काल देशाना कळालं. मणीपूरमध्ये बाहेरुन दहशतवादी कसे आले असतील हे काल लक्षात आलं, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी संसद भवनातील घुसकोरीवर बोलताना देशाच्या सुरक्षांचा आणि सीमारेषांचा प्रश्न उपस्थित केला.
देशाच्या संसदेची सुरक्षा, जिथे चोख बंदोबस्त असतो. त्या संसदेत काही मुलं घुसली, त्यांच्याकडे शस्त्रास्त्र नव्हती ते ठिक. पण, सभागृहात त्यांनी उड्या मारल्या, गोंधळ निर्माण झाला. देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान गप्प आहेत, हे सरकार गेल्या महिनाभरापासून निवडणुकांमध्ये व्यस्त आहे, मुख्यमंत्री ठरवण्यात व्यस्त आहे, शपथग्रहणमध्ये व्यस्त आहे आणि देशाची सुरक्षा हवेत आहे, असा जोरदार हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला.