..तर देशाचे पुन्हा तुकडे होतील - जमीयत उलेमाचा इशारा
By admin | Published: March 29, 2015 11:56 AM2015-03-29T11:56:44+5:302015-03-29T11:58:23+5:30
घर वापसी व हिंदू राष्ट्राच्या नावाखाली तेढ पसरवणा-या कट्टरतावाद्यांवर लगाम लावला नाही तर देशाचे पुन्हा तुकडे पडतील असा इशाराच जमीयत उलेमा ए हिंद या संघटनेने दिला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. २९ - घर वापसी व हिंदू राष्ट्राच्या नावाखाली तेढ पसरवणा-या कट्टरतावाद्यांवर लगाम लावला नाही तर देशाचे पुन्हा तुकडे पडतील असा इशारा जमीयत उलेमा ए हिंद या संघटनेने दिला आहे. देशातील जातीयवादी संघटना सुरक्षा यंत्रणांना हाताशी धरुन मु्स्लीम तरुणांविरोधात कट रचत आहे असा गंभीर आरोपही जमीयत उलेमाने केला आहे.
शनिवारी लखनौत जमीयत उलेमाच्या कार्यकारिणीची एक बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाविरोधात एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावात संघावर बाबरी मस्जिद पाडल्याचा आरोप लावण्यात आला असून संघावर बंदी घालावी अशी मागणीही संघटनेने केली आहे. भारत हा लोकशाही देश असून देशातील प्रत्येक व्यक्तीला धर्मस्वातंत्र्य आहे. पण आता देशाला कायदा व न्यायाच्या मार्गावरुन अराजकतेच्या मार्गावर नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत असा आरोपही यात करण्यात आला. घर वापसी व हिंदू राष्ट्राच्या नावाखाली ज्या संघटना तेढ पसरवत आहेत त्या संघटना स्वतःच्याच धर्माची चुकीची प्रतिमा निर्माण करत आहे असा चिमटाही उलेमाच्या प्रस्तावात काढण्यात आला आहे.
जमीयतचे अध्यक्ष मौलाना अर्शध मदानी म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुसलमानांनी सर्वाधिक बलिदान केले आहेत. धर्माच्या आधारे देशाचे एकदा विभाजन झाले आहे. आता या सर्व प्रकारांवर लगाम लावला नाही तर देशाचे पुन्हा तुकडे होऊ शकतील. कट्टरतवादी संघटनांकडून तेढ पसरवण्याचे उद्योग सुरु असताना पंतप्रधान यावर संसदेत उत्तर देऊ शकले नाही अशी टीकाही मदानी यांनी नरेंद्र मोदींवर केली.