'तेव्हा मला माझं तोंड लपवावं लागतं', देशातील वाढत्या रस्ते अपघातांवर नितीन गडकरी थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 18:16 IST2024-12-12T18:16:26+5:302024-12-12T18:16:48+5:30

देशात दरवर्षी 1.7 लाखांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. यातील 60 टक्के 18 ते 34 वर्षातील लोक आहेत.

'Then I have to hide my face...', Nitin Gadkari spoke directly on the increasing road accidents in the country | 'तेव्हा मला माझं तोंड लपवावं लागतं', देशातील वाढत्या रस्ते अपघातांवर नितीन गडकरी थेट बोलले

'तेव्हा मला माझं तोंड लपवावं लागतं', देशातील वाढत्या रस्ते अपघातांवर नितीन गडकरी थेट बोलले

Nitin Gadkari : देशभरात दररोज हजारो अपघात घडतात, यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा भाष्य केले आहे. दरम्यान, रस्ते अपघाताबाबत भारताची स्थिती किती खराब आहे, याबाबत गडकरींनी महत्वाची माहिती दिली. गुरुवारी लोकसभेत बोलताना गडकरी म्हणाले की, 'रस्ते अपघातांबाबत आपल्या देशाचा रेकॉर्ड इतका वाईट आहे की, आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये मला तोंड लपवावे लागते.'

अपघात कमी होण्याऐवजी वाढत आहेत 
नितीन गडकरी यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले की, 'रस्ते अपघात कमी करण्यासाठी मंत्रालयाकडून विविध प्रयत्न करण्यात आले, मात्र अपघात कमी झाले नसून, वाढले आहेत. जोपर्यंत समाजाचा पाठिंबा मिळत नाही, कायद्याचा धाक राहत नाही, तोपर्यंत रस्ते अपघातांना आळा बसणार नाही.'

नितीन गडकरी यांच्या मते, देशात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरवर्षी 1.7 लाखांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. यातील 60 टक्के पीडित 18 ते 34 वयोगटातील आहेत. रस्ते अपघातात मरणाऱ्या लोकांच्या संख्येबद्दल ते म्हणाले, 'इतके लोक ना कोणत्याही युद्धात, ना कोविडसारख्या महामारीत किंवा दंगलीत मेले नाहीत, तेवढे लोक रस्ते अपघातात मरण पावत आहेत. जेव्हा मी आंतरराष्ट्रीय परिषदांना जातो आणि तेथे रस्ते अपघातांवर चर्चा होते, तेव्हा मी माझा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतो. रस्ते अपघातात भारताचा रेकॉर्ड सर्वात घाणेरडा आहे.'

यावेळी रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्व खासदारांनी आपल्या पातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन गडकरींनी केले. तसेच, परिवहन विभागाच्या मदतीने सर्व शाळा, संस्था इत्यादींमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचा सल्लाही दिला.

ड्रायव्हिंग लायसन्सबाबत कठोरता असावी
गडकरींच्या म्हणण्यानुसार, 'NITI आयोगाच्या अहवालात असे म्हटले आहे की, रस्ते अपघातातील 30 टक्के बळी योग्य वेळी उपचार न मिळाल्याने पडतात. यासाठी सरकारने कॅशलेस योजना आणली आहे. हा पायलट प्रोजेक्ट उत्तर प्रदेशमध्ये सुरू केला जात आहे, त्यानंतर तो देशभर लागू केला जाईल. सध्या देशात ड्रायव्हिंग लायसन्सबाबत कठोरता आणण्याची गरज आहे. जगात ड्रायव्हिंग लायसन्स मिळणे सोपे असेल, तर ते भारतात आहे. आम्ही त्यात सुधारणा करत आहोत,' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.    

Web Title: 'Then I have to hide my face...', Nitin Gadkari spoke directly on the increasing road accidents in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.