"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 02:33 PM2024-10-06T14:33:52+5:302024-10-06T14:34:26+5:30

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये 'जनता की अदालत' कार्यक्रमात अरविंद केजरीवालांनी हे वक्तव्य केले.

"..then I myself will campaign for PM Modi", Arvind Kejriwal's big statement | "..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य

"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी छत्रसाल स्टेडियमवर आयोजित जाहीर सभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केजरीवालांनी डबल इंजिन सरकार म्हणजे दुहेरी लूट, अशी टीका केली. तसेच, पंतप्रधान मोदींच्या 10 वर्षांच्या कार्यकाळावरही प्रश्न उपस्थित केला. 'पंतप्रधान मोदींनी 22 राज्यांमध्ये वीज मोफत केली, तर मी स्वतः मोदींचा प्रचार करेन,' असा दावाही त्यांनी केला.

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये 'जनता की अदालत' कार्यक्रमाला संबोधित करताना अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान मोदींना आव्हान दिले. ते म्हणाले की, "या लोकांनी(BJP) 10 वर्षात काहीही केले नाही. PM मोदी पुढील वर्षी 75 वर्षांचे होतील, त्यामुळे निदान आतातरी त्यांनी काही काम करा. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांनी एनडीए शासित 22 राज्यांमध्ये मोफत वीज देण्याची घोषणा केली, तर मी स्वतः भाजपचा प्रचार करेन", असे केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल पुढे म्हणतात, "हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील भाजपच्या डबल इंजिन सरकारचा अंत होतोय. झारखंड आणि महाराष्ट्रातही तेच होणार आहे. डबल इंजिनचे सरकार म्हणजे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार...हे सर्वसामान्य जनतेला समजले आहे. दिल्लीच्या निवडणुका येत आहेत. दिल्लीत आल्यानंतर ते (भाजप) म्हणतील की, डबल इंजिनचे सरकार बनवा. पण, यूपीमध्ये गेल्या 7 वर्षांपासून डबल इंजिनचे सरकार आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या जागा निम्म्या झाल्या. मणिपूरमध्ये 7 वर्षांपासून डबल इंजिनचे सरकार आहे. दोन वर्षांपासून मणिपूर जळत आहे."

दिल्ली पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत केजरीवाल म्हणतात, "दिल्लीची सुरक्षा भाजपच्या ताब्यात आहे, पोलिस त्यांच्या पाठीशी आहेत, तरीही दिल्लीत गुन्ह्यांवर नियंत्रण का होत नाही? ते सुरक्षेची जबाबदारी सांभाळू शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी इतरांना कामे करू द्यावी. दिल्लीच्या बसमध्ये प्रवास करताना महिलांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते, हे मला माहीत आहे. त्यामुळेच आम्ही बसमध्ये मार्शल तैनात करण्यास सुरुवात केली. या बस मार्शलमुळे अनेक मोठे गुन्हे रोखले गेले आहेत आणि मुलांचे अपहरणही अयशस्वी केले."

"हे लोक गरीब विरोधी आहेत. गरीब कुटुंबातील 15,000 रुपये पगार घेणाऱ्या 10,000 बस मार्शलच्या नोकऱ्या काढून घेतल्या. हे लोक गरिबांच्या विरोधात काम करत आहेत. स्लिप बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले, गटार साफ करणाऱ्या 1,000 लोकांना कामावरुन काढले, विधवा, वृद्ध आणि डीटीसी कर्मचाऱ्यांचे पेन्शनही बंद करण्यात आले आहे. या लोकांना गरीबांची हाय नक्की लागणार," अशी बोचरी टीकाही केजरीवालांनी यावेळी केली.
 

Web Title: "..then I myself will campaign for PM Modi", Arvind Kejriwal's big statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.