... तर पुढील ५ वर्षात भारत 'आत्मनिर्भर' होईल, अमित शहांनी सांगितला मंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 01:25 PM2020-05-13T13:25:31+5:302020-05-13T13:26:12+5:30
देशवासियांना मंगळवारी संदेश देतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही स्वावलंबी भारत बनवू शकतो. निश्चय केला तर कोणतेही लक्ष्य साध्य करता येते.
नवी दिल्ली - एका लहानश्या विषाणूने अवघे जग उद्ध्वस्त केले आहे. संपूर्ण जग जीव वाचविण्यासाठी लढा देत आहे. कोरोनामुळे ओढवलेल्या अभूतपूर्व संकटांची कोणी कल्पनाही केली नव्हती. हे संकट भारतासाठी एक संदेश आणि संधी घेऊन आले आहे. सर्व नियमांचे पालन करुन बचाव करण्यासह आम्हांला पुढेही जायचे आहे, असा संदेश देत पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी २० लाख कोटी रुपयांची विशेष आर्थिक योजना घोषित केली. तसेच चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचे नियम आणि नवीन स्वरुप असल्याचे संकेत दिले. त्यानंतर, गृहमंत्री अमित शहा यांनी आत्मनिर्भर म्हणजे स्वावलंबी बनण्याचा मंत्र देशवासीयांना दिला आहे.
देशवासियांना मंगळवारी संदेश देतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही स्वावलंबी भारत बनवू शकतो. निश्चय केला तर कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. निश्चयाने भारत स्वावलंबी होऊ शकतो. शेतकरी, श्रमिक, गरीब, मध्यम वर्गासह समाजातील सर्व घटकांसोबत कुटीर, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगाल दिलासा देण्यासाठी घोषित २० लाख कोटींच्या विशषे आर्थिक योजने स्वावलंबी भारताला गती मिळेल. सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने घोषित केलेल्या निर्णयांसह हे विशेष आर्थिक पॅकेज २० लाख कोटींचे असेल. ते देशाच्या ढोबळ उत्पादनाच्या (जीडीपी) १० टक्के आहे. या पॅकेजची विस्तृत माहिती वित्तमंत्री निर्मला सीतारामण येत्या काही दिवसांत देतील.
गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आत्मनिर्भर भारत होण्यासाठी स्वदेशीचा नारा दिला आहे. देशातील नागरिकांना स्वदेशी म्हणजे देशात बनणाऱ्या वस्तूंचाच सर्वाधिक वापर करावा, तसेच इतरांनाही स्वेदशीचं महत्त्व पटवून देत त्यांनाही याच वस्तुंच्या वापराचा आग्रह करावा, असे अमित शहा यांनी सांगितले. तसेच, जर प्रत्येक भारतीय नागरिकाने भारतात बनणाऱ्या स्वदेशी वस्तूंच्या वापराचा संकल्प केल्यास, पुढील ५ वर्षात देशातील लोकशाही आत्मनिर्भर म्हणजेच स्वावलंबी बनू शकते, असा मूलमंत्रच शहा यांनी दिला आहे.
मैं देश की जनता से भी अपील करता हूं कि आप देश में बने उत्पादों को अधिक से अधिक उपयोग में लायें व अन्य लोगों को भी इसके प्रति प्रोत्साहित करें। हर भारतीय अगर भारत में बने उत्पादों (स्वदेशी) का उपयोग करने का संकल्प ले तो पांच वर्षों में देश का लोकतंत्र आत्मनिर्भर बन सकता है।
— Amit Shah (@AmitShah) May 13, 2020
दरम्यान, आपल्या भाषणात मोदी म्हणाले की, आम्हाला या काळाने शिकवले आहे की, लोकलला (स्थानिक) आपला जीवनमंत्र बनवावाच लागेल. आपल्याला जे काही ग्लोबल ब्रांड लागतात, तेही कधी तरी असेच लोकल होते. जेव्हा तेथील लोकांनी त्याचा वापर सुरू केला व प्रचार केला तेव्हा ते लोकलच होते. त्यांचे ब्रांडिंग केले गेले. त्यांच्याबाबत अभिमान बाळगला गेला तेव्हा तर ते लोकलपासूल ग्लोबल झाले. त्यामुळे आज प्रत्येक भारतीयाने आपल्या लोकलसाठी व्होकल बनले पाहिजे. तुम्ही केवळ लोकल प्रॉडक्टच खरेदी करून भागणार नाही तर त्याचा अभिमानही बाळगला पाहिजे. तुमच्या प्रयत्नांनी तर तुमच्यावरील माझी श्रद्धा आणखी वाढली आहे.