"तेव्हा हेच खासदार म्हणाले होते की...", संजय राऊतांनी शिंदे गटात गेलेल्या खासदारांवर डाव उलटवला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 08:24 PM2022-07-19T20:24:12+5:302022-07-19T20:24:51+5:30
Sanjay Raut: शिंदे गटात गेलेल्या १२ खासदारांविरोधात शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे कमालीचे आक्रमक झाले आहेत. तसेच त्यांनी शेवाळेंसह शिंदे गटात गेलेल्या खासदारांना प्रत्युत्तर दिले आहे.
नवी दिल्ली - शिवसेनेच्या १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, भाजपासोबत युतीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच प्रयत्नशील होते, असा दावा शिंदे गटात गेलेले खासदार राहुल शेवाळे यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. त्यानंतर आता या १२ खासदारांविरोधात शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे कमालीचे आक्रमक झाले आहेत. तसेच त्यांनी शेवाळेंसह शिंदे गटात गेलेल्या खासदारांना प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे हे प्रत्येक गोष्ट आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन सांगत असतात. महाविकास आघाडीच्यावेळीही ही महाविकास आघाडी आपण कोणत्या परिस्थितीत करत आहोत, तसेच भारतीय जनता पक्षाने आपल्यावर ही वेळ आणली आहे. तसेच हे भाजपानंच आपल्यावर लादलं आहे, म्हणून आपण महाविकास आघाडीच्या दिशेने निघालो आहोत, हे उद्धव ठाकरे यांनी आम्हा सर्वांना विश्वासात घेऊन सांगितलं होतं. तेव्हा या सर्व खासदारांनी या प्रयोगाचं स्वागत केलं होतं, भाजपाला धडा शिकवण्याची ही संधी आहे. ज्यांनी आपला अपमान केला. ज्यांनी ठाकरेंचा शब्द पाळला नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत, मातोश्रीवर दिलेला शब्द पाळला नसेल तर त्यांना आपण शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवू शकतो, हे दाखवून देण्याची ही संधी आहे, असं म्हणत महाविकास आघाडीच्या प्रयोगाचं स्वागत करणारी ही लोकं आहेत, त्यांची नावं आता मी घेत नाही, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, ठाकरे कुटुंब आणि नरेंद्र मोदी यांच्यातील संबंध हे राजकारणापलिकडचे आहेत. त्यामुळे, जो कोणी हा गौप्यस्फोट केलाय, त्यांना अधिक माहिती असेल. किंवा मोदींनीच त्यांना ही माहिती सांगितली असेल, असे म्हणत संजय राऊत यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्या गौप्यस्फोटावर प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे स्वत: भाजपासोबत युतीसाठी आग्रही होते. पण, खासदार संजय राऊत यांनी खोडा घातला असा घणाघाती आरोप राहुल शेवाळे यांनी केला होता. विशेष म्हणजे युतीसाठी उद्धव ठाकरे जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले होते. त्यावेळी त्यांनी तासभर चर्चाही केली होती. मात्र, पुढच्या जुलै महिन्यात भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. त्यामुळे, ही बोलणी पुढे सरकलीच नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.