... तर लोकसभेचा निकाल ५-६ दिवस विलंबाने लागणार; काय चाललेय सर्वोच्च न्यायालयात?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 06:10 PM2024-04-11T18:10:57+5:302024-04-11T18:16:02+5:30
Loksabha Election EVM-VVPAT Supreme Court: लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. मतदान ठरलेल्या वेळेतच होणार, परंतु निकालाला विलंब होण्याची शक्याता.
लोकसभा निवडणूक सुरु असतानाच ईव्हीएमसोबतच व्हीव्हीपॅटमधील मतांच्या पावतीची देखील मोजणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. यावर १६ एप्रिलला सुनावणी ठेवण्यात आली असून यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या तारखेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने मार्च २०२३ मध्ये ही याचिका दाखल केली होती. ईव्हीएमच्या १०० टक्के मतांशी व्हीव्हीपॅटच्याही पावत्यांची जुळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठामध्ये याची सुनावणी होत आहे.
अशाप्रकारची याचिका आधीही करण्यात आली होती. २१ पक्षांनी केलेल्या आधीच्या याचिकेमध्ये प्रत्येक मतदारसंघात ५० ट्क्के मतांची व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने असे केल्यास निकाल येण्यासाठी कमीतकमी पाच दिवस लागू शकतात असे म्हटले होते. तसेच यावर निकाल देताना प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील ५ ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमध्ये नोंद झालेल्या मतांची जुळणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. तोवर निवडणूक आयोग एकाच ईव्हीएमच्या मतांची व्हीव्हीपॅटसोबत जुळणी करत होता. विरोधकांनी पुन्हा यावर पुनर्विचार याचिका दाखल केली होती, ती न्यायालयाने फेटाळली होती.
आता पुन्हा १०० टक्के मोजणी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल सकारात्मक दिल्यास लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास कमीतकमी १० दिवस लागण्याची शक्यता आहे. गेल्या वेळची सर्वोच्च न्यायालयाची भुमिका पाहता असे होणे कठीण दिसत आहे. परंतु, पाच ईव्हीएमची संख्या वाढून ५०-१०० होऊ शकते. १०० टक्के मोजणीचा आदेश आल्यास ४ जूनचा निकाल हा १० ते १५ दिवसांनी पुढे जाण्याची शक्यता आहे.