... तर मोदींच्या प्रतिमेस धक्का बसेल, शिवसेनेनं करुन दिली त्या भाषणाची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 08:29 AM2020-06-18T08:29:14+5:302020-06-18T08:30:12+5:30
चीनमधील घटनेनंतर गलवान खोऱ्यातील तणाव संपविण्यासाठी भारत व चीनच्या मेजर जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अमेरिकेसारख्या मस्तवाल महासत्तेलाही न जुमानणार्या चीनची स्वतःची एक जागतिक फळी आहे
मुंबई - भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चीनने सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्याला भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात ३५ चिनी सैनिक
गंभीर जखमी किंवा मृत झाले असल्याची माहिती अमेरिकी गुप्तचर यंत्रणच्या हवाल्याने देण्यात आली आहे. भारत व चिनी सैनिकांमध्ये सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात भारताचे एका कर्नलसह २० जवान शहीद झाले होते. गेल्या पाच दशकांमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये इतकी मोठी चकमक पहिल्यांदाच घडली आहे. या चकमकीनंतर शिवसेनेनं चीनचा हल्ला म्हणत मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच, चीन हा पाकिस्तानसारखा नसून जागतिक पातळीवर ठसा उमटलेला देश आहे, असे शिवसेनेनं म्हटलंय.
चीनमधील घटनेनंतर गलवान खोऱ्यातील तणाव संपविण्यासाठी भारत व चीनच्या मेजर जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अमेरिकेसारख्या मस्तवाल महासत्तेलाही न जुमानणार्या चीनची स्वतःची एक जागतिक फळी आहे. चीन साम्राज्यवादी आणि घुसखोर आहे . त्याने हिंदुस्थानवर आधीच अतिक्रमण केले आहे. लडाखच्या हिंदुस्थानी हद्दीत घुसून चीनने जो हल्ला केला तो एक इशारा आहे. दिल्लीत बैठका आणि चर्चा सुरू आहेत . तणाव कोणालाच नको आहे. सध्याच्या काळात तो कोणालाच परवडणारा नाही, पण 20 जवानांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे काय ? प्रतिकार झालाच नाही तर मोदी यांच्या प्रतिमेस त्यामुळे धक्का बसेल, असे म्हणत शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टार्गेट केलं आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बाण सोडण्यात आले आहेत. 'सीमेवरील संघर्षाची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागते. चीनबरोबर जो संघर्ष आज सुरू आहे त्याचे कूळ आणि मूळ पंडित नेहरूंच्या फसलेल्या परराष्ट्र धोरणात आहे असे जाहीर सभांतून सांगितल्याने टाळ्या मिळतील, पण आज जवानांची बलिदाने सुरू आहेत ती थांबवण्याची जबाबदारी मोदी सरकारचीच आहे. 'गडबड सीमेवर नसून दिल्लीत आहे. दिल्लीची सरकारे नामर्द आहेत म्हणून सीमेवर शत्रू अरेरावी करतो', असे सहा वर्षांपूर्वी जोरकसपणे सांगणारे नरेंद्र मोदी आज दिल्लीचे सर्वसत्ताधीश आहेत. त्यामुळे आज जे घडले आहे त्याचा प्रतिकार मोदींनाच करावा लागेल.', असे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून मोदींना त्यांच्या जुन्या भाषणाची आठवण करुन देण्यात आली आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर मोदींचं हे भाषण व्हायरल होत आहे.