....तर 500 आणि 2000च्या नोटाही चलनातून होणार बाद
By admin | Published: March 9, 2017 04:13 PM2017-03-09T16:13:57+5:302017-03-09T16:14:29+5:30
500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर होळीचा रंग लागल्यास बँक त्या नोटा स्वीकारणार नाही
ऑनलाइन लोकमत
फरिदाबाद, दि. 9 - तुम्ही जर होळी खेळण्याचा विचार करत असाल तर काही विशिष्ट वस्तू व्यवस्थित सांभाळण्याची गरज आहे. होळी खेळत असताना खिशात नोटा ठेवू नका, कारण 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर होळीचा रंग लागल्यास बँक त्या नोटा स्वीकारणार नाही. होळीच्या रंगात रंगलेल्या नोटा फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातच जमा करता येणार आहेत.
आरबीआयनं क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत ही गाइड लाइन जारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरच्या व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर याचे मॅसेजही व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर फिरत असलेले हे मॅसेजमध्ये तथ्य असल्याच्या वृत्ताला बँक अधिका-यांनी दुजोरा दिला आहे. आरबीआयकडून ही गाइडलाइन जारी करण्यात आली आहे. 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर रंग किंवा पेनानं काही लिहिलं असल्यास त्या नोटा बँकेत जमा करण्यात येणार नाही, अशी माहिती दिल्लीतल्या सेक्टर 16 मधल्या पंजाब अँड सिंड बँकेचे चीफ मॅनेजर अनिल कुमार यांनी दिली आहे.
तत्पूर्वी 500 आणि 1000च्या बंद करण्यात आलेल्या नोटांना रंग लागला असल्यास किंवा त्या नोटांवर पेनानं काही लिहिलं गेल्यास त्या बँकेत चालत होत्या. ब-याचदा सण असलेल्या घरात बनवलेल्या पक्वान्नच्या तेल नोटांना लागत होते. मात्र तरीही अशा नोटा बँकेत स्वीकारल्या जात होत्या. मात्र नोटाबंदीनंतर आरबीआयनं क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत नव्या नोटा स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
(लवकरच चलनात येणार दहा रुपयांची नवी नोट)
नोटाबंदीपूर्वी 500 आणि 1000च्या नोटांवर काही जण स्वतःचं नाव लिहीत होते. नोटांवर पंचिंगही केलं जात होतं. त्याप्रमाणेच स्टेपल करत होते. मात्र या सर्व प्रकारावर आरबीआयनं पूर्णतः बंदी घातली आहे, अशी माहिती सिंडिकेट बँकेचे डीजीएम के. के. अग्रवाल यांनी दिली आहे. होळीच्या दिवशी नव्या नोटेवर रंग अथवा पेन चुकूनही चालल्यास त्या नोटा बँक स्वीकारणार नाही. अशा नोटा ग्राहकांना स्वतः जाऊन थेट आरबीआयमध्ये जमा कराव्या लागणार आहेत. सोशल मीडियावरचे प्रभावी माध्यम असलेले फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेले मॅसेजही खरे असल्याचं मत अग्रवाल यांनी मांडलं आहे.