...तेव्हा मोदींनी केला होता मला फोन, दिला होता असा सल्ला, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उघड केलं गुपित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 02:19 PM2024-02-22T14:19:26+5:302024-02-22T14:30:26+5:30
D. Y, Chandrachud : भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून दिलेल्या सल्ल्याची आठवण सांगितली आहे.
भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात असलेल्या आयुष समग्र कल्याण केंद्राचं उद्घाटन केलं. यादरम्यान, त्यांनी कोविडच्या साथीदरम्यान आपल्याला आलेल्या अनुभवाचा उल्लेख केला. यादरम्यान, त्यांनी सांगितले की, कोरोनाचा फैलाव होऊ लागल्यापासून मी आयुषशी जोडला गेलो आहे. मला कोरोनाचा गंभीर संसर्ग झाला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला फोन केला आणि तुम्ही लवकर बरे व्हाल, सर्व काही ठीक होईल, अशी मला अपेक्षा आहे, असे म्हणाले.
चंद्रचूड पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला सांगितले की, तुमची प्रकृती सध्या बरी नाही आहे, याची मला जाणीव आहे. मात्र आम्ही सर्व प्रयत्न करू. एक वैद्य आहेत जे आयुषमध्येही सचिव आहेत. मी त्यांच्याशी संपर्क साधण्याची व्यवस्था मी करतो. ते तुम्हाला औषध आमि इतर सर्व काही पाठवून देतील.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले की, जेव्हा मला कोरोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हा मी आयुषमधून औषध घेतलं होतं. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा मला कोरोना झाला तेव्हा मी अजिबात अॅलोपॅथिक औषधं घेतली नाही. मात्र सद्यस्थितीत सर्व न्यायमूर्ती, त्यांचे कुटुंबीय आणि सर्वोच्च न्यायालयातील दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची मला चिंता वाटते, कारण त्यांना न्यायमूर्तींसारख्या सुविधा मिळत नाहीत.
ते म्हणाले की, त्यांच्याजवळ जीवनाचा समग्र पॅटर्न असावा, अशी मला अपेक्षा आहे. तसे मी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचेही आभार मानतो. मी योग करतो. मी शाकाहारी आहे. मागच्या पाच महिन्यांपासून मी शाकाहाराचं पालन केलं आहे. आता ते मी पुढे कायम ठेवणार आहे. मी जीवनामध्ये समग्र पॅटर्नवर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करतो, असेही सरन्यायाधीशांनी सांगितले.