"...तर आदिवासी देशद्रोही बनले असते"! मोहन भागवत यांना काय म्हणाले होते प्रणब मुखर्जी? सरसंघचालकांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:24 IST2025-01-15T13:24:21+5:302025-01-15T13:24:59+5:30
मोहन भागवत यांनी दावा केला आहे की, "प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती असताना संघाच्या 'घर वापसी' कार्यक्रमाचे कौतुक केले होते आणि जर हा कार्यक्रम नसता तर काही आदिवासी समुदाय देशद्रोही बनू शकले असते, असे म्हटले होते."

"...तर आदिवासी देशद्रोही बनले असते"! मोहन भागवत यांना काय म्हणाले होते प्रणब मुखर्जी? सरसंघचालकांचा मोठा दावा
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी करिअरच्या अखेरच्या टप्प्यात आपल्या राजकीय विचारांमुळे सातत्याने चर्चेत होते. ते अजूनही अनेक वेळा चर्चेत येतात. यातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांचा एक किस्सा सांगितला आहे. मोहन भागवत यांनी दावा केला आहे की, "प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती असताना संघाच्या 'घर वापसी' कार्यक्रमाचे कौतुक केले होते आणि जर हा कार्यक्रम नसता तर काही आदिवासी समुदाय देशद्रोही बनू शकले असते, असे म्हटले होते." भागवत इंदूर येथे राष्ट्रीय देवी अहिल्या पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते.
"आदिवासी आपल्या मूळ रुपात आले, हे..." -
भागवत पुढे म्हणाले, "आपण जेव्हा पहिल्यांदाच प्रणब मुखर्जी यांना भेटण्यासाठी गेलो होतो, तेव्हा संसदेत 'घर वापसी' वरून प्रचंड गदारोळ सुरू होता. तेव्हा प्रणब मुखर्जी यांनी आपल्याला विचारले होते की, आपण काही लोकांना परत आणले, तर पत्रकार परिषद का घेतली? हे राजकारण आहे आणि आपण काँग्रेसमध्ये असतो, तर आपणही संसदेत हेच केले असते. मात्र, याच वेळी, या कार्यक्रमामुळे 30 टक्के आदिवासी समुदाय आपल्या मूळ रूपात परतला, हे चांगले आहे, असेही ते म्हणाले होते."
'धर्मांतर स्वयं प्रेरणेने झाले, तर काही वाईट नाही...' -
भागवत म्हणाले, "जर धर्मांतर स्वयं प्रेरणेने झाले तर त्यात काहीही वाईट नाही. आपला विश्वास आहे की, सर्व प्रकारच्या उपासना पद्धती योग्य आहेत आणि प्रत्येकाला त्याची उपासना पद्धत निवडण्याचा अधिकार असला हवा. मात्र, जेव्हा धर्मांतर प्रलोभन देऊन अथवा जबरदस्तीने केले जाते तेव्हा त्याचा उद्देश आध्यात्मिक प्रगती नसून प्रभाव वाढवण्यासाठी लोकांना त्यांच्या मुळांपासून तोडणे, असा असतो.
2018 मध्ये नागपूरात संघ कार्यक्रमत सहभागी झाले होते प्रणव मुखर्जी -
मोहन भागवत यांचे हे विधान अतंयत महत्त्वाचे आहे. कारण प्रणव मुखर्जी २०१८ मध्ये नागपुरात संघाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेव्हा याची बरीच चर्चा झाली होती. भागवतांनी त्यांच्या या निवेदनात मुखर्जी यांचे विचार नमूद केले आहेत. मात्र, प्रणव मुखर्जी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी कधीही हे विचार सार्वजनिकपणे व्यक्त केले नाहीत. पण, काही आदिवासी भागातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी या विषयावर यापूर्वी आपले विचार व्यक्त केले होते.