...तर तिप्पट झाले असते तुमचे बजेट, महिलांची काळजी करणारे सरकार - पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 09:55 AM2024-05-22T09:55:54+5:302024-05-22T09:56:20+5:30
"महिला सन्मानाची काळजी करणारे सरकार पहिल्यांदाच केंद्रात आले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे महिला संवाद कार्यक्रमात म्हटले."
महाराजगंज : काँग्रेसचे सरकार असते तर तुमच्या स्वयंपाकघरातील बजेट दोन-तीन पटीने वाढले असते. विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची मानसिकता महिलाविरोधी आहे. महिलांना आरक्षण देण्यास त्यांचा विरोध आहे. गेल्या १० वर्षांत पहिल्यांदाच माता, भगिनी व महिला सरकारी धोरणे आणि निर्णयांच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. महिला सन्मानाची काळजी करणारे सरकार पहिल्यांदाच केंद्रात आले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे महिला संवाद कार्यक्रमात म्हटले.
मोदी म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर नसते तर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातींना (एसटी) आरक्षण मिळू दिले नसते. भ्रष्टाचार, तुष्टीकरणाचे राजकारण व सनातनविरोधी विचारसरणी यांच्यासोबत इंडिया आघाडी उभी आहे आणि ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या सर्वांना मोठा धक्का बसेल, असा आरोपही पंतप्रधानांनी केला.
मोदींनी आरोप केला की, “काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी मिळून देशाची ६० वर्षे उद्ध्वस्त केली आहेत. गरीब अधिक गरीब होत गेला. तुमचे मत केवळ खासदार निवडण्यासाठी नाही, तर तुमचे मत सशक्त भारतासाठी मजबूत पंतप्रधान निवडण्यासाठी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
पहिल्या पाच टप्प्यांत भाजप ३१० जागा जिंकेल, अमित शाह यांचा दावा -
लोकसभा निवडणुकांचे पाच टप्पे पूर्ण झाले असून, त्यात भाजप ३१० जागा जिंकेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केला. ओदिशाची ‘बाबू-राज’पासून मुक्तता करा, असे आवाहन त्यांनी त्या राज्याच्या जनतेला केले. संबलपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारसभेत शाह यांनी सांगितले की, लोकसभेच्या सहाव्या व सातव्या टप्प्यानंतर एनडीए ४००पेक्षा जास्त जागा जिंकण्याची शक्यता आहे. ओदिशामध्ये सरकारी अधिकारीच राज्य चालवत आहेत. ही स्थिती संपविण्यासाठी विधानसभा निवडणुकांतही भाजपला विजयी करा, असे आवाहन अमित शहा यांनी केले.