PAN card: ...तर तुमचं पॅनकार्ड होणार निष्क्रिय, त्वरित आटोपून घ्या हे काम, सरकारने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 05:21 PM2022-12-10T17:21:18+5:302022-12-10T17:21:46+5:30
PAN card: पॅनकार्ड हा भारतातील सर्व करदात्यांना देण्यात आलेला एक नंबर आहे. पॅन एक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे. ज्याच्या माध्यमातून कुठल्याही व्यक्ती किंवा कंपनीची टॅक्स संदर्भातील माहिती एकाच पॅन क्रमांकामध्ये नोंद केली जाते.
मुंबई - आपली ओळख पटवण्यासाठी आणि वेगवेगळ्या कामांसाठी सरकारकडून काही कागदपत्रे जारी केली जातात. या दस्तऐवजांच्या मदतीने लोक आपली कामे सहजपणे करू शकतात. तसेच आर्थिक देवाण घेवाणीची नोंद ठेवण्यासाठी पॅनकार्डचा वापर केला जातो. देशात सरकार पॅनकार्डच्या मदतीने आर्थिक देवाणघेवाणीचं रेकॉर्ड ठेवत असते. प्राप्तिकर विभागाकडून पॅनकार्ड जारी केले जाते. मात्र आता पॅनकार्ड निष्क्रियसुद्धा होऊ शकते.
पॅनकार्ड हा भारतातील सर्व करदात्यांना देण्यात आलेला एक नंबर आहे. पॅन एक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे. ज्याच्या माध्यमातून कुठल्याही व्यक्ती किंवा कंपनीची टॅक्स संदर्भातील माहिती एकाच पॅन क्रमांकामध्ये नोंद केली जाते. हे माहितीचा स्त्रोत साठवून ठेवण्यासाठी प्राथमिक चावीसारखं काम करतो.
दरम्यान, आता पॅनकार्डबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार पॅनकार्ड हे आधारकार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. प्राप्तिकर विभागाकडूनही पॅनकार्ड हे आधारकार्डशी लिंक करण्याचे आवाहन वारंवार करण्यात आले आहे. मात्र अजूनही बऱ्याच लोकांनी पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक केलेले नाही.
आता पुन्हा एकदा प्राप्तिकर विभागाने ट्विट करून पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याचे आवाहन केले आहे. या ट्विटमध्ये प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे की, प्राप्तिकर अधिनियम १९६१ नुसार सर्व पॅनकार्ड धारकांसाठी जे सवलतीच्या श्रेणीत येत नाहीत. त्यांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. १ एप्रिल २०२३ पासून जे पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक नसतील ते सर्व पॅनकार्ड निष्क्रिय होतील. त्यामुळे ज्यांनी पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक केलेले नाहीत, त्यांनी ते लवकरात लवकर आधारकार्डशी लिंक करावेत.